चांदूर बाजार दि. १६। प्रतिनिधी
चांदूरबाजार येथे वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करताना एका अवैध टिप्परने थुगाव-पिंपरी येथील तलाठी यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत तलाठ्याची दुचाकी पूर्णपणे चेंदामेंदा झाली.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना घडली. निंभोरा गावाजवळ वाळूने भरलेल्या अवैध मिनी टिप्परने ग्राम महसूल अधिकारी विश्वजीत बंगरे यांच्या होंडा शाईन मोटरसायकलला धडक दिली. बंगरे हे काही महिन्यांपूर्वीच महसूल सेवेत रुजू झाले होते. या घटनेनंतर महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी
गोळा केली. त्यातून बंगरे यांना नवी दुचाकी खरेदी करून दिली. उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव आणि चांदूर बाजारचे तहसीलदार रामदास शेळके यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले.
तहसील कार्यालयात नव्या दुचाकीची पूजा करण्यात आली.
तहसीलदार शेळके यांच्या हस्ते बंगरे यांना दुचाकीची चावी देण्यात आली. या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार लक्ष्मीकांत तिवारी, सुमित सोनोने, गजानन फुके, ग्राम महसूल अधिकारी प्रतीक चव्हाण, हरीश तडकित, उमेश तागडे, अजय गवई आदी अधिकारी उपस्थित होते.