मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 27 व 28 जुलै तसेच 3 व 4 ऑगस्ट रोजी येत्या निवडणूकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
22
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 15 मतदार यादी अद्ययावत व अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक 27 व 28 जुलै 2024 तसेच 3 व 4 ऑगस्ट 2024 या दिवशी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी सर्व बीएलओ सर्व मतदान केंद्रावर उपस्थित राहतील. याबाबत महापालिकेच्या बीएलओ यांना सूचना देण्यात यावी. तसेच या तारखांना सर्व शाळा उघड्या राहतील याबाबत शाळांना मुख्याध्यापकांना अवगत करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज दिनांक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आढावा घेतांना श्री. कटियार बोलत होते. मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, तहसीलदार विजय लोखंडे, मनपाचे सर्व सहायक आयुक्त, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा दुसरा कार्यक्रम राबविताना मतदार याद्या अचूक होण्याबाबत विशेष प्रयत्न करावे. संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी असल्यास, मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीतील नोंदणी, दुरुस्ती आदी आवश्यक बाबींची नोंद घ्यावी. मतदारांची अधिकाधिक नाव नोंदणी व्हावी, यासाठी राजकीय पक्षांचे आवश्यक सहकार्य घ्यावे. युवकांची मतदार नोंदणी वाढावी म्हणून युवकांच्या मतदार नोंदणीसाठी विद्यापीठाचे सहकार्य घ्यावे. यंदाच्या विधानसभा निवडणूकामध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नव मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन श्री. कटियार यांनी यावेळी केले.

प्रारूप यादीत आपल्या नावाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. मागील लोकसभा निवडणूकीच्यावेळी नाव नाही अशी तक्रार झालेल्या मतदारांसाठी वार्डनिहाय मोहिम राबवून त्यांच्याकडून अर्ज क्रमांक सहा भरुन घ्यावा. तसेच मयत मतदारांच्या नातेवाईकांकडून अर्ज क्रमांक सात भरुन घ्यावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला व्यापक प्रसिध्दी द्यावी. घंटा गाडीवरही याबाबत माहिती द्यावी. शहरातील सरकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार केंद्र स्थापन करण्याच्या अनुषंगाने चाचपणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासाठी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील अचूक आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशीलामध्ये दुरुस्त्या करावयाच्या असतील त्यांनी अर्ज क्रमांक आठ भरावा. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याचबरोबर एखाद्याच्या नावासंबंधी हरकतीही घेता येते.

जे मतदार इतर मतदारसंघात सहभागी झाले आहेत किंवा इतर मतदार संघातून या ठिकाणी आले आहेत अशांचा शोध घेऊन मतदार यादीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची तपासणी करावी. काही सुधारणा करावयाची असेल तर संबंधित मतदार केंद्र अधिकारी यांना कळवावे, असे मनपा आयुक्त श्री. कलंत्रे यावेळी म्हणाले.

veer nayak

Google Ad