वीर नायक अपडेट!

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कृषीआधारीत प्रशिक्षणावर भर द्यावा – जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यात कृषी प्रक्रियावर आधारीत प्रशिक्षणाला वाव आहे. त्यामुळे जिल्हा कौशल्य विकास विभागाने प्रशिक्षणाचे कार्य राबविताना युवकांना रोजगार मिळेल, असे कृषी आधारीत प्रशिक्षणावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभागाच्या विविध प्रशिक्षण योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा कौशल्य विकासाचा आराखडा आज सादर करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परिविक्षाधिन अधिकारी कौशल्या, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, राज्य शासनाची महत्वाची असलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आली. सध्या 11 महिन्यांसाठी नेमलेले युवक कार्यरत आहेत. त्यांना त्यांचे विद्यावेतन नियमित मिळतील, याची दक्षता घ्यावी. यासोबतच विविध रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार प्राप्त करून देण्यात येत आहे. हे युवक कामावर असल्याचा नियमित आढावा घेण्यात यावा. प्रशिक्षणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यातून चांगला कायमस्वरूपी रोजगार मिळेल, अशी प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात यावी.

प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी मिळणे महत्वाचे आहे. यासाठी कृषी क्षेत्रासोबतच सध्या सौरऊर्जेवर आधारीत सोलार रूफटॉप, सोलार पंप आदी सामुग्री दुरूस्तीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. तसेच इलेक्ट्रीक वाहनांचाही वापर वाढलेल्या असल्याने या वाहनांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा. यासोबत जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारण या मेळघाट भागातील युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी संस्थांची नोंदणी करावी. जिल्ह्याच्या गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या.

शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात जिल्हा कौशल्य विभागाच्या अमरावती कार्यालयाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. यात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत

अमरावती, दि. 10 (जिमाका): राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील शिक्षकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण मंत्रालयाच्या https://nationalawardstoteachers.education.co या वेबपोर्टलवर 13 जुलै 2025 पर्यंत स्व-नामांकन करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2025 पर्यंत आहे. जिल्हा परिषद, राष्ट्रीय पुरस्कार 2025 च्या सुधारित अंमलबजावणी व वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया राबवली जात असून, शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख यांनी केले आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. त्यानंतर जुलै 2025 च्या मध्यात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून स्वतंत्र राष्ट्रीय ज्युरीची स्थापना केली जाईल. जिल्हा आणि प्रादेशिक निवड समित्यांकडून शिक्षकांची निवड प्रक्रिया 16 जुलै ते 25 जुलै 2025 या कालावधीत पूर्ण केली जाईल आणि निवडलेली यादी ऑनलाइन पोर्टलद्वारे राज्य निवड समितीकडे पाठवली जाईल. राज्य निवड समितीकडून ही यादी 26 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 पर्यंत राष्ट्रीय ज्युरीकडे पाठवली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना (कमाल 154) 5 ते 6 ऑगस्ट 2025 रोजी व्हीसी संवादाद्वारे सूचना दिली जाईल. ज्युरीद्वारे निवड प्रक्रिया 7 ते 12 ऑगस्ट 2025 या कालावधीत होईल आणि 13 ऑगस्ट 2025 रोजी नावे अंतिम केली जातील. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या मान्यतेनंतर 14 ते 20 ऑगस्ट 2025 पर्यंत निवडलेल्या उमेदवारांना सूचित केले जाईल. पुरस्कार वितरण सोहळ्याची रिहर्सल आणि प्रत्यक्ष पुरस्कार वितरण 4 आणि 5 सप्टेंबर 2025 रोजी पार पडेल. शिक्षकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले शैक्षणिक क्षेत्रातील योगदान राष्ट्रीय स्तरावर पोहोचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘ई-आर 1’ ऑनलाइन सादर करण्याचे आवाहन; अंतिम मुदत 30 जुलै

अमरावती, दि. 10 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांना आता रोजगार विषयक सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या असून, ‘ई-आर 1’ (ER-1) प्रपत्र ऑनलाइन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘ई-आर 1’ सादर करण्याची अंतिम मुदत 30 जुलै 2025 आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाने सुरू केलेल्या या ऑनलाइन सुविधांसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. उद्योजक आस्थापनांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती) कायदा 1959 व नियमावलीनुसार, त्रैमासिक ‘ई-आर 1’ ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.

जून 2025 रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठीचे ‘ई-आर 1’ प्रपत्र सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी उद्योजक आस्थापनांनी त्यांच्या युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाइन सादर करायचे आहे. तसेच, सादर केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून लगेच प्राप्त करून घ्यावे.

ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा 0721-2566066 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. ‘ई-आर 1’ ऑनलाइन सादर न करणाऱ्या कसुरदार आस्थापनांवर विहित नियमानुसार कार्यवाही केली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी कळवले आहे.

सहकार व्यवस्थापन पदविका (डि. सी. एम.) प्रवेश सुरू

अमरावती, दि. 10 (जिमाका): महाराष्ट्र शासन सहकार विभाग यांच्या वतीने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकारी व्यवस्थापन पदविका (डि. सी.एम.) अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळुन हा अभ्यासक्रम दुरुस्थ शिक्षण पध्दतीने पुर्ण करता यावा तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये सदर पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरू केला आहे.

सदर अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या, पुणे अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे दि. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2025 या मदतीकरीता दि. 1 जुलै ते 30 जुलै 2025 या मुदतीत प्रवेश देणे सुरू आहे. त्या करीता प्राचार्य भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्याशी संपर्क साधुन प्रवेश निश्चित करावा. संपर्क क्रमांक-9881047668 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांनी केले आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वर्षभर मोहीम; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

अमरावती, दि. 10 (जिमाका): जिल्ह्यात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता वर्षभर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या संदर्भात, शाळाबाह्य विद्यार्थी जिल्हा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच पार पडली.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, महिला व बालविकास अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, समग्र शिक्षाचे जिल्हा समन्वयक, तसेच माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक घरोघरी, बस स्थानके, रेल्वे स्थानके, हॉटेल्स, खानावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, वीटभट्ट्या आणि शेतशिवारात जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा. स्थलांतरित होणाऱ्या प्रत्येक मुलाला शाळेने शिक्षण हमी कार्ड द्यावे आणि ते मूल जिथे स्थलांतरित होईल, तेथील जवळच्या शाळेत त्याला प्रवेश द्यावा. मुख्याध्यापकांनी स्थलांतराची संभाव्य जागा आणि प्रवेशाची माहिती दप्तरी नोंदवून ठेवावी. या सर्वेक्षणात स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, तसेच माध्यमिक विभागाने 18 वर्षांपर्यंतच्या मुलींना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. सर्वेक्षण केवळ ठराविक कालावधीत न करता, वर्षभर ही प्रक्रिया चालू ठेवावी, जेणेकरून एकही मूल शिक्षणाविना राहणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

खरीप हंगामासाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धा जाहीर: शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. 10 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगाम 2025 साठी राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन केले असून, या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन राज्याच्या कृषी उत्पादकतेत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या 11 प्रमुख पिकांचा समावेश आहे. मूग आणि उडीदसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 असून, इतर पिकांसाठी 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, राहुल सातपुते यांनी केले आहे.

स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटाला प्रति पीक 300 रुपये तर आदिवासी गटाला 150 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल. शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आणि ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. भात पिकासाठी किमान 20 आर आणि इतर पिकांसाठी 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे.

ही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित केली जाईल आणि विजेत्यांना राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर आकर्षक रोख बक्षिसे दिली जातील. तालुका पातळीवर 5,000 रुपये, जिल्हा पातळीवर 10,000 रुपये, तर राज्य पातळीवर 50,000 रुपयांपर्यंतचे पहिले बक्षीस मिळेल.

इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, शुल्क भरल्याचे चलन, 7/12 उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पिकाच्या क्षेत्राचा नकाशा आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत या कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी, कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा येत्या सोमवारी

अमरावती, दि. 10 (जिमाका) : ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्या’चे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोर्शी रोड, अमरावती येथील एनएसएस हॉलमध्ये सोमवार, 14 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.

या मेळाव्यात नामांकित कंपन्या थेट तरुणांना शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करणार आहेत. या भरती मेळाव्यात पनवेल येथील प्रसिद्ध एल अँड टी सीएसटीआय तसेच जिल्ह्यातील प्रतिष्ठित स्थानिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विविध ट्रेडमधील उमेदवारांसाठी, तसेच 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी ही एक संधी आहे. या मेळाव्यात फिटर, वायरमन, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, सुइंग टेक्नॉलॉजी, ड्रेस मे़किंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कोपा, ट्रॅक्टर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिक या व्यवसायातील उमेदवारांनी सहभागी व्हावे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावतीचे उपसंचालक आणि सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी अधिकाधिक उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मेळाव्याला येताना उमेदवारांनी आपला बायोडाटा आणि मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या माध्यमातून अनेक तरुणांना चांगल्या कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्याची संधी मिळेल.

veer nayak

Google Ad