आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा यासाठी मतदान जनजागृती टीम वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जनजागृतींच्या कार्यक्रम राबवीत मतदारांमध्ये जनजागृती चे काम मोठ्या प्रमाणात करत आहे.
यामध्ये मतदानाची विविध कार्यक्रमात शपथ घेणे, मतदानाचा टक्केवारी वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना आवाहन करणे, महिला बाईक रॅली,महिला मॅरेथॉन रॅली, पुरुष सायकल रॅली आयोजित करणे, पथनाट्य, गीत गायन, वाद विवाद स्पर्धा, कॉलेज कॅम्पस अँबेसिडर इत्यादी माध्यमातून प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून याला मतदारांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
मागील वर्षी अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 60 टक्के होती. यामुळे यावर्षी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सुरुवातीपासूनच मतदान जनजागृती करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात व्यापक प्रसिद्धी देणे तसेच मतदारांपर्यंत पोहोचणे यावर जोर दिला आहे. त्यामुळे प्रचार प्रसिद्धीची टीम वेगवेगळ्या युक्ती लढवीत मतदारांपर्यंत पोहोचत आहे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चित मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास जिल्हाधिकारी सौरभ पटियार यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी यांच्या विश्वासाला सर्व मतदारांनी सार्थ ठरवत यावर्षी मोठ्या प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन सहाय्यक निवडला अधिकारी डॉ.कैलास घोडके यांनी केले आहे.
“आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा धागा मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने स्वतः तर पुढे यावेच परंतु आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, नव मतदार यांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करीत या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्वजण सहभागी होतील अशी अपेक्षा आहे”
संजीता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी तथा नोडल अधिकारी.