केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी दौरा

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 20 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवार, दि. 22 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. गडकरी यांचे सकाळी 10.15 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 12.15 वाजता श्री संत अच्युत महाराज हृदयरोग रुग्णालयातील नवीन कॅथलॅबच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील. दुपारी 1.45 वाजता शारदा उद्योग मंदिराच्या प्रकल्पाला भेट देतील. दुपारी 2.30 वाजता विश्रामगृह येथे अमरावती विभागातील राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांची आढावा बैठक घेतील. सायंकाळी 3.45 वाजता नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या न्यू हायस्कूलला भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 4.45 वाजता बेलोरा विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

उष्मालाटेपासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी

अमरावती, दि. 20 : हवामान विभागाने विदर्भात उष्मालाटेचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभर जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना उष्मालाटेपासून बचाव करावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

काय करावे : तहान लागलेली नसली तरी भरपूर पाणी प्यावे, हलके आणि सुती कपडे वापरावे, बाहेर जाताना गॉगल, टोपी आणि छत्रीचा वापर करावा. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर रुमाल किंवा टोपी वापरावी. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ओआरएस, लस्सी, लिंबूपाणी यासारखी पेये घ्यावे. उन्हाचा झटका बसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पशूधन आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवावे आणि त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. गरोदर महिला आणि आजारी कामगारांची विशेष काळजी घ्यावी.

काय करू नये : लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या गाडीत ठेवू नये. दुपारी 12 ते 3.30 वेळेत उन्हात जाणे टाळावे. जास्त शारीरिक श्रमाचे काम करणे टाळावे. तसेच उष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळावे, मद्य आणि शीतपेये घेणे टाळावे. उन्हात गाडी चालवणे टाळावे आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या जप्त वाहनांचा लिलाव

अमरावती, दि. 20 : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव मंगळवार, दि. 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजता तहसीलदार कार्यालयात होणार आहे.

गौणखनिज भरारी पथकांनी अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. यात वाहन मालकांनी दंड भरलेला नसल्याने 17 वाहनाचा लिलाव केला जाणार आहे.

इच्छुकांनी लिलावात सहभागी व्हावे, यासाठी 25 हजार रुपये इसारा रक्कम भरणे, पॅन कार्ड आणि रहिवासी पुरावा देणे आवश्यक आहे, असे अचलपूर तहसीलदार यांनी कळविले आहे.

00000

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यात सुमारे चार हजार 435 अर्ज महाविद्यालय आणि विद्यार्थीस्तरावर प्रलंबित आहेत. सदर अर्ज तातडीने निकाली काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येतात. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याकरिता दि. 25 जुलै 2024 पासून सुरूवात झाली. सन 2023-24 वर्षाचे महाडीबीटीनुसार जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर शिष्यवृत्तीचे 3 हजार 675 अर्ज, तर विद्यार्थीस्तर 760 अर्ज प्रलंबित आहेत.

मागील वर्षी 2023-24 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 20 हजार 521 अर्ज नोंदणीकृत झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सर्व योजनाचे सुमारे 18 हजार 733 विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत झाले आहे.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राचार्यांनी महाविद्यालयास्तरावरील प्रलंबित पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉ‍गीनकडे त्रृटी पूर्ततेसाठी परत केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत पुर्तता करून अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

000000

veer nayak

Google Ad