अमरावती, दि.7 नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपात्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरीत मदत मिळावी, तसेच आपत्तीची तीव्रता कमी करुन जीवित हानी टाळण्यासाठी सुसज्ज शोध व बचाव वाहन प्राप्त झाले आहे. या वाहनाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाला आज हस्तांतरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास किंवा अन्य कोणतीही आपत्ती उद्धभवल्यास त्याठिकाणी तातडीने पोहोचून उपाययोजना व शोध कार्य करण्याकरिता वाहनाचा उपयोग केला जाणार आहे. या वाहनामुळे आपत्तीची तीव्रता कमी करुन संभाव्य जीवित हानी टाळता येणार आहे. हे वाहन 24 तास आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सज्ज राहील. शोध व बचाव वाहनातील साहित्याची प्रत्यक्ष पाहणी करुन आपत्तीप्रसंगी कशा प्रकारे कार्य करण्यात येईल, याची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, तहसिलदार प्रशांत पडघम, निलेश खटके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर आदी उपस्थित होते.
जिल्हा शोध व बचाव वाहनाची खरेदी महसूल व वनविभाग(मदत व पुनवर्सन) विभागाकडून प्राप्त निधीमधून जेम्स पोर्टलव्दारे करण्यात आले. वाहनामध्ये जिल्हा शोध व बचाव पथकातील 12 कर्मचारी एकावेळी बसू शकतात. तसेच शोध व बचाव साहित्यातील लाईफ रिंग, लाईफ जॅकेट, कटर, इंन्फेटबल बोट, ओबीयम, जनरेटर, रोप, प्रथमोपचार पेटी, सर्चलाईट आदी सुसज्ज साहित्यासह वाहन जिल्हा शोध व बचाव पथकाला हस्तांतरण करण्यात आले