अमरावती, दि. 7 (जिमाका): निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात गुरूवार, दि. 14 नोव्हेंबरपासून गृहमतदानास सुरूवात होणार आहे. सलग तीन दिवस शनिवार, दि. 16 नोव्हेंबरपर्यंत हे मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील नागरिक आणि दिव्यांगांना घरून मतदान करण्याची सोय दिली आहे. यासाठी त्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 12 डी फॉर्म भरून द्यावा लागला. या फॉर्मची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील 2 हजार 862 मतदार पात्र गृहमतदानासाठी ठरले आहेत. 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात 360, बडनेरा 192, अमरावती 221, तिवसा 484, दर्यापूर 273, मेळघाट 150, अचलपूर 388, मोर्शी 354 असे एकूण यात 2 हजार 422 ज्येष्ठ नागरिक मतदार मतदान करणार आहेत.
त्यासोबतच धामणगाव रेल्वे मतदारसंघात 52, बडनेरा 53, अमरावती 82, तिवसा 47, दर्यापूर 48, मेळघाट 22, अचलपूर 67, मोर्शी 69 असे एकूण यात 440 दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत.
गृहमतदानासाठी विधानसभानिहाय चमू तयार करण्यात आली आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघात 20, बडनेरा 25, अमरावती 19, तिवसा 15, दर्यापूर 15, मेळघाट 14, अचलपूर 15, मोर्शी 16 अशा 139 गृहमतदानाची नोंदणी केल्या मतदारांच्या घरी जाऊन पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेणार आहे.
गृहमतदानाची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे. मतदारांनी लेखी मागणी केल्यास त्यांना मदतनीसाची मदत घेता येणार आहे. मात्र एका मदतनीसाला केवळ एका मतदाराला मदत करता येणार आहे. गृहमतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षक करावयाचे असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.