राजुरा गावातील डॉ. श्रीराम राजुरकर यांचा गावात सत्कार सोहळा जल्लोषात
शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिकेत आयोजन
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
“शिक्षणात जिद्द आणि पालकांच्या कष्टांचा आदर असेल, तर यश नक्की मिळते. अपयश आल्यास हार न मानता पुन्हा सुरुवात करावी. चांगली संगत आणि सातत्य हेच यशाचे रहस्य आहे.” असे मत न्यायाधीश भूषण महादेवराव काळे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून व्यक्त केले. चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा गावातील सुपुत्र डॉ. श्रीराम अशोकराव राजुरकर यांनी ऑस्ट्रेलियात कॅन्सर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या यशानंतर गावात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षीय स्थानाचे भाषण करतांना बोलत होते.


फटाक्यांच्या आतषबाजीत व छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरस्वती मातेच्या प्रतिमांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्यास न्यायाधीश भूषण महादेवराव काळे व न्यायाधीश नानाजी केशवराव मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर गावातील धर्मेंद्र पांडुरंग गडपायले (महाराष्ट्र पोलीस), संकेत ज्ञानोबा अजमिरे (इलेक्ट्रिकल इंजिनिअर, पुणे) व अनिशा विजयराव देशमुख (इंडियन नेव्ही) यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. श्रीराम राजुरकर यांनी सांगितले, “मेडिकल क्षेत्रात अनेक संधी आहेत. मी.ही गावातील विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यास सदैव तयार आहे.” यानंतर धर्मेंद्र गडपायले यांनी नमूद केले, “गरिबी अडथळा नाही. मेहनत आणि अभ्यास हेच यशाचे गुरुमंत्र आहेत.” याशिवाय अनिशा देशमुख यांनी मुलींना संदेश दिला, “प्रत्येक मुलीने स्वावलंबी व्हावे आणि पालकांचा अभिमान व्हावा.” तर आयोजक ग्रा.पं. सदस्य भूषण काळे यांचे मत व्यक्त करतांना म्हटले की, “गावातील तरुण घडले पाहिजेत, गाव प्रगतीच्या मार्गावर जावे हा माझा ध्यास आहे. ग्रामस्थांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहीन.” सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रा.पं. सदस्य भूषण शिवदासराव काळे, शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिका विद्यार्थी व मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रामस्थांची व विद्यार्थ्याची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
विश्वास आणि परिश्रम कायम ठेवले, तर स्वप्न साकार होते – न्यायाधीश नानाजी मेश्राम
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना न्यायाधीश नानाजी मेश्राम यांनी प्रेरणादायी शब्दांत म्हटले, “स्वप्न हे डोळे उघडे ठेवून पाहायचे असतात. घरची परिस्थिती कितीही कठीण असो, जर विश्वास आणि परिश्रम कायम ठेवले, तर प्रत्येक स्वप्न साकार होते.”















