चांदूर रेल्वे परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र नाराजी
चांदूर रेल्वे –तालुक्यातील शेतकरी वर्ग दिवाळीनंतर आता खरीप हंगामातील उत्पादन विक्रीसाठी सज्ज झाला असताना,शासनाकडून सोयाबीन आणि कापूस शासकीय खरेदी केंद्रांना अद्याप प्रारंभ न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापसाची लागवड केली होती. मात्र सध्या बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला केवळ ३२०० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव दिला जात आहे, जो शासकीय हमीभाव ५,३२८ रुपये प्रति क्विंटल पेक्षा तब्बल ११२८ ते २१२८ रुपयांनी कमी आहे. तर कापसाचा ८१॰॰ रूपये हमीभाव असून सध्या बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून ६॰॰॰ ते ६३॰॰ रूपये दराने कापूस खरेदी केला जात आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने हमीभावाने सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. बाजारपेठेत व्यापारी आपल्याच मनमानीने दर ठरवत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन विक्री करतांना तोटा सहन करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांना तर आर्थिक अडचणींमुळे कमी दरात माल विकावा लागत आहे.
शासनाने तात्काळ केंद्र सुरू न केल्यास तिव्र आंदोलन – प्रशांत शिरभाते
“शासनाकडून सोयाबीन व कापसाच्या शासकीय खरेदी केंद्रांना अजूनही सुरुवात झालेली नाही, हे शेतकऱ्यांवरील अन्यायच आहे. बाहेर व्यापारी सोयाबीनला ३२०० ते ४२०० रुपये भाव देत असताना शासनाने घोषित केलेला हमीभाव ५,३२८ रुपये आहे. हा फरक शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरणारा आहे. हाच फरक कापसात सुद्धा दिसून येत आहे. शासनाने तात्काळ केंद्र सुरू करून हमीभावाने खरेदी सुरू करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,”
प्रशांत शिरभाते
(तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)
















