चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
चांदूर रेल्वे स्टेशनवर शालीमार एक्सप्रेस व जबलपुर एक्सप्रेसच्या थांब्यासाठी रेल रोको कृती समितीच्या माध्यमातून सर्व पक्षीय रेल रोको महाआंदोलन १७ फेब्रुवारीला होणार होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी जबलपुर एक्सप्रेसच्या चांदूर रेल्वे स्टेशनवर थांब्याचे पत्र प्राप्त झाले. तसेच शालीमार एक्सप्रेसच्या थांब्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लेखी आश्वासन रेल्वे अधिकारी यांच्याकडून शुक्रवारी ९.३० वाजता रेस्ट हाऊसवर देण्यात आले. यानंतर शनिवारी नियोजित रेल रोको आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती रेल रोको कृती समितीतर्फे शुक्रवारी रात्री १० वाजता देण्यात आली.
चांदूर रेल्वे स्थानकावर कोरोनापूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी जबलपूर एक्स्प्रेस (१२१५९/१२१६०) आणि शालिमार एक्स्प्रेस (१८०२९/१८०३०) या दोन गाड्यांचा थांबा कोरोनानंतर रद्द करण्यात आला. सदर थांबे पुर्ववत करण्यात यावे याकरिता १७ फेब्रुवारीला रेल रोको कृती समितीमार्फत रेल रोको आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे सदर आंदोलन मागे घेण्यासंदर्भात शुक्रवारी रेस्ट हाऊसवर दुपारपासून ते रात्रीपर्यंत रेल रोको कृती समितीचे सदस्य व रेल्वे विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली. यावेळी नागपुर येथील रेल्वेचे आर्थिक विभागाचे एसीएम संजय मुळे, मंगेश गेडाम, दिपक कुमार, जीआरपी नागपुर पीआय विकास कानकुलेवार, एपीआय उमेश मुंडे, आरपीएफ पीआय आर.एस. मीना, पीएसआय एच. एल. मीना, एएसआय गजानन जाधव, खुपिया सुनिता चौधरी, चांदूर रेल्वेचे ठाणेदार अजय अहिरकर, खुपिया योगेश कडूकार हे उपस्थित होते. मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते. अखेर सायंकाळच्या दरम्यान जबलपुर एक्सप्रेसच्या थांब्याचे पत्र रेल रोको कृती समितीला देण्यात आले. आणि शालीमार एक्सप्रेसच्या थांब्याचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयाला पाठविला असुन ही मागणी पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लेखी आश्वासन रेल्वे अधिकारी संजय मुळे यांच्याकडून रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांना देण्यात आले, या थांब्याकरिता खासदार व आमदारांनी वरच्या स्तरावर विशेष प्रयत्न केले. यानंतर रात्री १० वाजता स्थानिक जुना मोटार स्टँड येथे सदर आंदोलनाला स्थगिती दिल्याची घोषणा करीत एका गाडीला थांबा मिळाल्याने फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी विश्रामगृहावर नितीन गवळी, रावसाहेब रोठे, प्रणव जोशी, खासदार चे पीए राजु हजारे, , कॉ. विनोद जोशी, भारत गेडाम, मेहमूद हुसैन, बच्चू वानरे, मदन कोठारी, हर्षल वाघ,कॉ. रामदास कारमोरे, बंडुभाऊ यादव, राजाभाऊ भैसे, बाळासाहेब सोरगीवकर, हर्षल वाघ, सतिश देशमुख, प्रशांत शिरभाते,संजय डगवार, प्रसन्ना पाटील, डॉ. वसंतराव खंडार, अजय हजारे, संदीप गंगण, चरण जोल्हे, प्राविण्य देशमुख, ए.ए. घोडेश्वर, धर्मराज वरघट, सचिन चुटके, भीमराव खलाटे, महादेवराव शेंद्रे, संजय बाबर,कॉ. हरिश्चंद्र चव्हाण, अनंत देशमुख, अनिल शिंदे, प्रफुल्ल कोकाटे, विजय मिसाळ, बंटी भारूका यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
अन्यथा आंदोलन करणार !
जबलपुर एक्सप्रेसला थांबा मिळाला असुन शालीमार एक्सप्रेसच्या थांब्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहे. अशा लेखी पत्रानंतर आज शनिवारच्या आंदोलनाला स्थगिती दिली असुन येत्या काही दिवसांत शालीमार एक्सप्रेसला थांबा मिळाला नाही तर पुन्हा आंदोलनाचे नियोजन करण्यात येईल अशी माहिती रेल रोको कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.