तळेगाव दशासर ग्रामपंचायत सरपंचांचा विशेष आमसभा घेण्यास नकार; ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर गाव सध्या ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना तसेच 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित भ्रष्टाचाराच्या चर्चेमुळे चर्चेत आले आहे.ग्रामपंचायत तळेगाव दशासर यांचा कार्यकाळ दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी संपुष्टात येणार असल्याने गावातील युवकांनी विशेष आमसभा घेण्याची मागणी करत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते. यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सरपंच यांना नोटशीट दिली असता, सरपंच यांनी त्यामध्ये सरळ नकार दिल्याचे समोर आले आहे. तसेच प्रशासक लागल्यानंतर आमसभा घेण्याचा सल्ला सरपंचांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट गटविकास अधिकारी, पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांच्याकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाद्वारे मागील पाच वर्षात शासनाकडून प्राप्त झालेला निधी आणि त्याचा खर्च याचा संपूर्ण हिशेब मागितला आहे. मात्र सरपंचांनी विशेष आमसभा घेण्यास नकार दिल्यामुळे गावकऱ्यांनी आता गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात विशेष आमसभा घेऊन संपूर्ण निधीचा हिशेब गावकऱ्यांसमोर सादर करण्याची मागणी केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना तुषार धनजोडे (जिल्हा महामंत्री, भाजप युवा मोर्चा अमरावती ग्रामीण) यांनी सांगितले की,
“मागील पाच वर्षांपासून तळेगाव दशासर हे गाव विकासापासून कोसो दूर राहिले आहे. गावातील युवक हिशोब मागतात यात चुकीचे काय? जर ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणात विकास झाला असेल तर तो जनतेसमोर ठेवावा, हीच गावकऱ्यांची मागणी आहे. विशेष आमसभा घेण्यास नकार देणे चुकीचे असून आमसभा हा जनतेचा अधिकार आहे. जनतेला त्या अधिकारापासून वंचित ठेवणे अत्यंत चुकीचे आहे.”
या प्रकरणामुळे गावात मोठी चर्चा सुरू असून आता पंचायत समिती स्तरावरून यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad