धामणगाव रेल्वे,
चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हा आपल्या भारतीयांचा नववर्ष दिवस.या नविन वर्षाचे स्वागत, सडा, रांगोळी, गुढ्या, तोरणे, मंगल वाद्य वादन या पारंपरिक पद्धतीने तर आपण करतोच,पण उगवत्या सूर्याच्या साक्षीने, सूर व स्वरांना सोबत घेऊन नववर्षाचे सामुहिक स्वागत करण्यासाठी
येथील वंदे मातरम ग्रुपतर्फे गुढी पाडवा निमित्त येथील नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन रविवारला (ता.३०) पहाटे साडे पाच वाजता करण्यात आले आहे.
चैत्राची सोनेरी पहाट…
नव्या स्वप्नांची नवी लाट …
नवा आरंभ नवा विश्वास …
नव्या वर्षाची हिच तर खरी सुरुवात…
याचा प्रत्यय रविवारला येणार आहे. निमित्त आहे,वंदे मातरम् ग्रुपने आयोजित केलेल्या पाडवा पहाटेचे.गेल्या अनेक वर्षापासून वंदे मातरम् ग्रुपतर्फे पाडवा पहाटेचे आयोजन केल्या जात आहे.गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी ३० मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं.दरम्यान येथील वंदे मातरम् ग्रुपतर्फे पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन रविवारला शहरातील नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.यानिमित्ताने पहाटेला सुरेल मंजुळ स्वरांची मेजवानी मिळणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन वंदे मातरम ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बोबडे व सर्व पदाधिकारी व सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.
——-