चांदूर रेल्वे : तालुक्यातील जावरा (ता. चांदूर रेल्वे) येथे श्री संत सद्गुरू सुरेश बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित पालखी सोहळा व महाप्रसाद कार्यक्रम आज भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सकाळी ठीक ९ वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. या सोहळ्यात एकूण ४९ भजन दिंड्यांनी सहभाग घेतला. तसेच ढोल-ताशे व लेझीम पथकाच्या गजरात संपूर्ण गाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

हा कार्यक्रम डॉक्टर विलास गाढवे (पोलीस पाटील) यांच्या शेतामध्ये असलेल्या समाधी स्थळावर संपन्न झाला. याठिकाणी विधिवत पूजा-अर्चा व आरती करून संतांच्या चरणी भाविकांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
या सोहळ्यात सहभागी पालखी व दिंडीतील भाविक भक्तांसाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन अल्पहाराची व्यवस्था केली होती. यामध्ये चहा व बिस्कीट देण्यात आले.
यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गावासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, भक्तगण व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
















