चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
कोरोनापुर्वी चांदूर रेल्वे स्टेशनवर असलेल्या शालीमार एक्सप्रेस (कुर्ला एक्सप्रेस) चा पुर्ववत थांबा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले होते. मात्र अद्यापही सदर गाडीच्या थांब्याचे चिन्हे दिसत नसुन शालीमार एक्सप्रेसचा थांबा कधी मिळणार ? असा सवाल प्रवासीवर्ग उपस्थित करीत आहे.
चांदूर रेल्वे स्थानकावर कोरोनापूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी जबलपूर एक्स्प्रेस (१२१५९/१२१६०) आणि शालिमार एक्स्प्रेस (१८०२९/१८०३०) या दोन गाड्यांचा थांबा कोरोनानंतर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे चांदूर रेल्वे सह आजुबाजुच्या तालुक्यातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे १७ फेब्रुवारी रोजी चांदूर शहर बंद ठेवून त्यानंतर त्याच दिवशी सर्व नागरिक रेल्वे रुळावर येऊन रेल रोको महाआंदोलन करू असा इशारा रेल रोको कृती समितीने रेल्वे विभागाला दिला होता. यानंतर खासदार रामदास तडस यांनी रेल्वे विभागाकडे दिल्ली येथे जाऊन पाठपुरावा केला व स्थानिक परिस्थिती तेथील अधिकाऱ्यांना अवगत करून दिली. यानंतर १६ फेब्रुवारीलाच सायंकाळी जबलपुर एक्सप्रेसच्या थांब्याचे पत्र रेल रोको कृती समितीला मिळाले व शालीमार एक्सप्रेस (कुर्ला एक्सप्रेस) च्या थांब्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन नागपुर येथील रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. यानंतर २२ फेब्रुवारीपासून अमरावती – जबलपुर एक्सप्रेसचा थांबा सुरू झाल्यामुळे याचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती. यावेळी खासदार रामदास तडस यांचीही उपस्थिती होती. तर शालीमार एक्सप्रेसचा थांबा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळवून देणार असल्याचे आश्वासन खासदार तडस यांनी यावेळी दिले होते. मात्र पहिला आठवडा उलटूनही सदर गाडीच्या थांब्याबाबतचे कुठलेही पत्र आलेले नसुन सदर प्रक्रीया कासवगतीने सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपुर्वी सदर गाडीच्या थांब्याची शक्यता कमी दिसत असुन यावर खासदार रामदास तडस यांनी ठोस पाऊले उचलने गरजेचे असल्याचे मत प्रवासीवर्ग व्यक्त करीत आहे, अन्यथा नागरिकांच्या नाराजीचा फटका सुध्दा संबंधितांना बसू शकतो ऐवढे मात्र नक्की.
1) आचारसंहितेपुर्वी थांब्याचे पत्र द्या – नितीन गवळी
येत्या काही दिवसांत लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी खासदार रामदास तडस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्थानिक स्टेेशनवर शालीमार एक्सप्रेसचा थांबा आचारसंहिता लागण्यापुर्वी मिळवून द्यावा. कारण आम्ही रेल्वे अधिकारी आणि खासदार साहेबांच्या आश्वासनानंतरच रेल रोको आंदोलन मागे घेतले होते. आश्वासनाची पुर्तता न झाल्यास प्रवासीवर्गात तिव्र असंतोष निर्माण होईल. त्यामुळे खासदार साहेबांनी रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार करून आम्हाला तत्काळ शालीमार एक्सप्रेसचा थांबा मिळवून द्यावा, अन्यथा आम्हाला निवडणुकीनंतर पुन्हा जनआंदोलनाचे नियोजन करावे लागेल.
नितीन गवळी अध्यक्ष, रेल रोको कृती समिती, चांदूर रेल्वे
2) २०१९ मध्ये ६ लाख रूपयांची आरक्षणातून कमाई
रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांना माहितीच्या अधिकारातून प्राप्त माहितीनुसार, कोरोनापुर्वी थांबा असतांना १/१/२०१९ ते ३१/१२/२०१९ या एक वर्षाच्या कालावधीत चांदूर रेल्वे स्टेशनवरून शालीमार एक्सप्रेस (कुर्ला एक्सप्रेस) या गाडीचे (अप – डाऊन) ६ लाख १ हजार ९०१ रूपयांची आरक्षण तिकिटे काढण्यात आली. याव्यतिरिक्त विना आरक्षण तिकिट, मासिक पास वाले या प्रवाशांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात असते. ऐवढे उत्पन्न असतांनाही थांबा बंद का करण्यात आला ? असा प्रश्न सुध्दा नितीन गवळी यांनी उपस्थित केला.