धामणगाव रेल्वे (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव येथे ‘क्लासरूम मॅनेजमेंट’ या विषयावर शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक समृद्ध परंपरा असलेल्या या विद्यालयाने शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमतेत सातत्याने वृद्धी घडवून आणण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेत स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव आणि पुलगाव येथील गांधी सिटी पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या प्रमुख वक्ता म्हणून श्रीमती वृशाली वाघमारे आणि श्रीमती जागृती गंडे यांनी शिक्षकांसोबत संवादात्मक व प्रभावी सत्र घेतली. सत्रामध्ये त्यांनी अध्यापनातील ‘क्लासरूम मॅनेजमेंट’चे महत्त्व, विविध तंत्रे आणि त्यांचे शैक्षणिक परिणाम याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या अध्यापन कार्यात निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल, अशी भावना सहभागी शिक्षकांनी व्यक्त केली. याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांमधील सुसंवाद, समजूतदारपणा आणि विश्वासाचे नाते अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी आधुनिक अध्यापन कौशल्य आत्मसात करून सतत प्रगती साधावी, यासाठी शाळा नेहमीच अशा उपक्रमांद्वारे त्यांना दिशा देते.”
या कार्यशाळेला प्री-प्रायमरी विभाग प्रमुख श्रीमती शबाना खान तसेच प्री-प्रायमरी विभागातील सर्व शिक्षिका यांनीही उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. त्यांनी प्रभावी प्रशिक्षण दिल्याबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या आणि स्रोत व्यक्तींचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षण समन्वयक श्रीमती स्नेहल राऊत, प्रशासकीय अधिकारी श्री प्रितेश जानवडे, श्री श्रीकांत निस्ताने, श्री सुमित हनवते तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.
ही कार्यशाळा शिक्षकांसाठी स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरली असून, भविष्यात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यात ती निश्चितच मोलाची ठरेल.