प्रतिनीधी/अमरावती
भातकुली ग्रामीण भागात अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या सायत-नांदेड मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली तिथे पाणंद रस्त्याचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. पण शेतीसाठी चांगला रस्ता असल्यावर शेतीमाल वाहतूकीचा तसेच अत्याधुनिक यंत्रे शेतात घेऊन जाता यावीत या उद्देशाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेसारखी अनेक योजना राबवली जात आहे. त्याअनुशंगाने राज्य सरकारने प्रस्तावही मागवून घेतले. शिवाय रस्ते कामांना मंजुरीही मिळाली आहे. मात्र, १४ जून २०२४ काम पूर्ण व्हायची शेवटची तिथी असूनसुद्धा प्रत्यक्षात कामाला सुरवातच झालीच नाही.आसरा ते नांदेडा पांदन रस्ता बांधकाम अनुक्रमे १७/SDO/२०२२/२०२३ नुसार २४ लक्ष ८८ हजार ९५० रुपयांचे काम मंजूर करण्यात आले होते. परंतु अद्यापही ‘परिस्थिति जैसे थे’ असल्या कारणाने संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी संताप व्यक्त केला.
या ठिकाणी अद्यापही काम सुरू झाले नसून वाळवंटी भूभाग व मातीचे ढीग आढळून येत आहे. शेतकऱ्यासोबत नितीन कदम यांनी त्याठिकाणी पाहणी केली. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे दरवर्षीप्रमाणे यावेळीही आहे. आतापर्यंत रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूकीचा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांची ईच्छा असून नगदी पिके घेता आली नाहीत. शिवाय यंत्र सामुग्री शेतामध्ये घेऊन जाणे शक्य झाले नाही. आता रस्ता कामाला मंजुरी मिळाल्यानंतर का होईना प्रश्न मार्गी लागेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण प्रत्यक्षात शेत शिवारात रस्ता कामाबाबत कोणत्याच हलचाली नाहीत. पावसाळ्यापुर्वी कामे सुरु झाले नाही म्हणून यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हालच होणार आहेत. ज्या तत्परतेने योजनेचे नामकरण झाले त्याच तप्परतेने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांना होती . दरम्यान शेतमालाला दर न मिळणं ही मोठी समस्या आहेच मात्र तो माल शेतातून बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे ही सुद्धा एक समस्या आहे. तसेच शेतीच्या मशागतीसाठी अत्याधुनिक यंत्रे शेतात घेऊन जाण्यातही फार मोठी समस्या उभी रहाते. पावसाळा सुरू झाला आहे. त्याआधी ही कामं पूर्ण व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे होणारी अधिकारी वर्गाची गडचेपी व कंत्राटदारची मुजोरी यामुळे मोठा गैरप्रकार सदर निर्माणकार्यात असल्याचे नाकारता येत नाही. करिता प्रत्येकाची भूमिका संशयास्पद असल्याचे शेतकाऱ्यांकडून व नागारिकांकडून बोलले जात आहे. यावेळी सदर कामाची पाहणी करायला गेले असता संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम ,स्वप्नील मालधुरे,अभिषेक सवाई,रोशन सनके सोबतच परिसरातील शेतकरी , व संघटनेचे सदस्य,पदाधिकारी उपस्थित होते .
नितीन कदम (अध्यक्ष : संकल्प शेतकरी संघटना)
सदर पांदन रस्ता बांधकाम पूर्ण झाल्याची प्रशासनाची अंतिम तारीख संपली असता अद्यापही काम सुरू झालेल नाही. पावसाळा सुरू झाला असतांना आता शेतकऱ्यांना दळण वळणाकरिता मोठी नरकयातना सहन करावी लागणार.तालुक्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असतांनासुद्धा प्रशासन गप्प का ? असा प्रश्न उपस्थित होतोय. येथील कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा व त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी ..