धामणगाव रेल्वे,
मनुष्यामध्ये सत्व, राजस आणि तामस असे तीन गुण असतात. आसुरी शक्तीचा नेहमी अंतच होत असतो. आपण ज्यावेळी उपासना करतो त्यावेळी निश्चितच आपले गुण वाढत असतात, शक्ती वाढत असते. श्रीराम हे सर्व सद्गुणांचे प्रतीक आहेत. तमो गुण नष्ट करून सत्वगुण अंगीकारल्यास सर्व क्षेत्रात यश प्राप्त होते. तसेच कोणत्याही प्रकारचे युद्ध असो ते करताना शुद्ध चरित्र असणे आवश्यक असते. श्रीरामांच्या अशा शुद्ध चरित्रामुळेच ते जिंकले आणि तमो गुणामुळे रावण हरला. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी सुद्धा सत्कार्यात आपले जीवन व्यतीत केले. म्हणून आज आपल्याला हा संकल्प पहावयास आणि प्रत्यक्ष करावयास मिळतो आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.
डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवार धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दत्त येथील माहूरची उपशक्ती पीठ मंगला माता देवस्थानला भेट दिली. ही भेट ऐतिहासिक ठरली. क्षण होता संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांच्या या मंदिरातील भेटीला ८१ वर्ष पूर्ण झाल्याचा. गोळवळकर गुरुजींनी ज्यावेळी या मंदिराला भेट दिली होती, त्यावेळी एका छोट्याशा झोपडीमध्ये हे मंदिर होते. या मंदिराला आता भव्य दिव्य रूप प्राप्त झाले आहे.
पुढे बोलताना सरसंघचालक म्हणाले, शील असल्याशिवाय शक्ती येत नाही आणि शक्तीशिवाय संकल्प होत नाही. जिथे शील आहे तिथे संकल्प पूर्ण होतोच आणि विवेक असला की सर्व गोष्टी सरळ होतात. तसेच जिथे अहंकार येतो तिथे कोणत्याच गोष्टी शक्य होत नाही. रावण महापराक्रमी होता, महाबलवान होता, सर्व गुणांनी संपन्न होता. परंतु रावणाच्या अंगात अहंकार आल्यामुळे त्याला पराजय स्वीकारावा लागला तर दुसरीकडे सर्व शक्तिमान श्रीराम हे सदैव विवेकपूर्ण आणि अहंकार मुक्त असल्यामुळे त्यांनी रावणाला मात दिली.
या मंगलमय प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगला मातेची आरती करण्यात आली. मंगरूळ दत्त येथील श्री मंगला माता मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य श्री माधव सदाशिवराव गोवळकर गुरुजी यांचे १९४२ ला आगमन झाले होते. या साक्षात्काराच्या ८१ व्या वर्ष पूर्ती निमित्य मंगरूळ येथे मंगला माता मंदिराद्वारे १०० साधकांच्या माध्यमाने श्री गुरुचरित्र पारायण सोहळा, घोरकष्टोद्धरण स्त्रोताचे एक हजार पाठ अनुष्ठान, मंगरूळ येथील पुरोहितांद्वारे श्री दुर्गा सप्तशतीचे ११०० पाठ आणि ५००० भक्तांद्वारे घरोघरी श्री हनुमान चालीसा उपासना अभियान इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते. या अभियानाचा समारोप सोहळा सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी मंचावर जिल्हा संघचालक विपीन काकडे, मंगला माता देवस्थान संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर खानझोडे उपस्थित होते .
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर खानझोडे यांनी केले. त्यांनी मंदिरासह मंगरूळचा इतिहास विशद केला. मंगरूळसारख्या छोट्याशा गावातून संघाकरिता ४ प्रचारक निघाल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. मंगला माता मंदिराच्या विकासामध्ये संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराचे मुख्य पुजारी मोहन देव यांनी यावेळी संकल्पाचे वाचन केले. आपल्या अभिप्रायामध्ये सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी संकल्पांचा विशेष उल्लेख केला.
मंगला माता मंदिर ट्रस्टचे दिवाकर देशपांडे, प्रशांत शेटे, राजेंद्र सोनी, मोहन महाराज देव, जुगल किशोरजी मुंदडा, शरदचंद्र देशपांडे, प्रदीप फडणवीस आदींनी याप्रसंगी डॉ. मोहनजी भागवत यांची भेट घेतली आणि संस्थेच्या प्रारूपाची त्यांना माहिती दिली. कार्यक्रमाला मंगरूळ तथा परिसरातील महिला-पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती. अनेक संत, महंत सुद्धा यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वैभव पोतदार यांनी केले तर आभार सचिव रवींद्र देशपांडे यांनी व्यक्त केले.