दर्यापूर (ता.प्रतिनिधी)- दर्यापूर तालुका हा क्रीडा क्षेत्राची पंढरी म्हणून सुपरिचित आहे. कब्बडी तर दर्यापूर शहराचा अभिमान असणारा खेळ आहे.या अस्सल मातीतील खेळाला जिवंत ठेवण्याचे काम वैष्णवी स्पोर्टींग क्लबने केले आहे.
मागील काही महिने आधी कु.श्रावणी वाट या कबड्डी खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत खेळत विदर्भ व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
याच पावलावर पाऊल टाकत कु.ईश्वरी दिनेश अरबट हिने सुद्धा गगनभरारी घेत पुन्हा एकदा दर्यापूरच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
पटणा(बिहार)येथे होणाऱ्या 33 व्या राष्ट्रीय सब जुनिअर कब्बडी स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे. ती वैष्णवी स्पोर्टींग क्लबची खेळाडू असून तालुका क्रीडा संकुल येथे केले कब्बडीचे राष्ट्रीय प्रशिक्षक परीक्षित चिकटे यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करत असते.
तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,ऑल इंडिया कब्बडी असोसिएशनचे सचिव जितेंद्रजी ठाकूर,विदर्भ कब्बडी असोसिएशनचे सचिव सतीश डफळे,वैष्णवी स्पोर्टींग क्लबचे अध्यक्ष डॉ अविनाश ठाकरे व प्रशिक्षक परीक्षित चिकटे यांना दिले आहे.
तिच्या या कामगिरीचे दर्यापूर तालुक्यातील क्रीडा रसिकांनी भरभरून कौतुक केले आहे.