जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल चे वाटप!
अंगणवाडीतील ऑनलाईन कामकाज होणार सुकर: सौरभ कटियार.
अमरावती जिल्ह्यामध्ये तीन हजार अंगणवाडी केंद्र कार्यरत असून या केंद्रातील सर्व अंगणवाडी सेविकांना आणि त्यांच्यावर पर्यवेक्षण करणाऱ्या पर्यवेक्षिकांना नवीन मोबाईल चे वाटप सौरभ कटियार, जिल्हाधिकारी अमरावती आणि संजीता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सर्व अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना नवीन मोबाईल मिळाल्यामुळे आता सर्वांनी पोषण ट्रॅक्टर मध्ये उत्तम दर्जांचे काम करावे असे मत सौरभ कटियार जिल्हाधिकारी अमरावती यांनी व्यक्त केले.
महिला व बाल विकास विभागामार्फत ज्या अंगणवाड्या कार्यरत आहेत त्या अंगणवाडी केंद्रातील सेविकांना पूर्वीप्रमाणे रजिस्टर मध्ये काम न करता ऑनलाइन काम करण्यासाठी पोषण ट्रकर हे ॲप केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रातील बालकांची आणि गरोदर स्त्रीया व स्तनदा माता यांची सर्व माहिती पोषण ट्रॅकरवर ऑनलाईन उपलब्ध असते. यासाठी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र उघडणे, बालकांना आहार देणे, गृहभेटी करणे, त्याचबरोबर कुपोषित बालकांचे मोजमाप करणे इत्यादी बाबी ऑनलाईन कराव्या लागतात. अंगणवाडी केंद्रातील सर्व कामे ऑनलाईन झालेले असल्यामुळे त्यांना चांगल्या गुणवत्तेचे मोबाईल असावेत, असी मागणी बऱ्याच दिवसापासून सेविकांची होती. त्यामुळे आयुक्तालयाकडून सर्व अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना सॅमसंग कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल प्राप्त झाले असून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात येत आहेत.
आज प्रतिनिधीक स्वरूपात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर डॉ.कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काही अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वाटप करण्यात आले. यावेळी सौरभ कटियार जिल्हाधिकारी हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की महिला बाल विकास विभाग हा एक महत्त्वपूर्ण विभाग असून या विभागांची सर्व माहिती ऑनलाईन असणे ही एक उत्तम बाब आहे. त्यामुळे शासनाला आणि प्रशासनाला जी अत्यावश्यक माहिती असते ती एका क्लिकवर मिळते. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच पर्यवेक्षिका यांनी मोबाईलचा चांगल्या पद्धतीने वापर करून उत्तम प्रकारे कामकाज केल्यास निश्चितच विभागाच्या कामकाजाला गती येईल असे विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी संजिता मोहपत्रा,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही अंगणवाडी सेविकांना उत्कृष्ट काम करण्यासाठी सूचना करून महिला बालविकास विभागाला एका वेगळ्या उंचीवर न्यावे आणि कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना केल्या.
यावेळी डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विलास दुर्गे, वीरेंद्र गलपट, प्रतिभा माहुलकर, चित्रा वानखेडे, योगेश वानखेडे, शिवानंद वासनकर, विजय काळे आणि अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.