प्रतिनीधी/अमरावती
केंद्र सरकारने पिण्याच्या पाण्यासाठी पुढील तीस वर्षांचा आराखडा तयार करून राबविलेली ‘जलजीवन मिशन’ ही योजना पाण्याअभावी कोरडी पडल्याचे चित्र गावोगावी आहे. ‘हर घर नल से जल’ असा गाजावाजा करत ही योजना राबविली गेली खरी परंतु अश्याच योजनेचा फज्जा उडालेला दिसत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्यावतीने पाणी पुरवठा विभागाद्वारे हर घर जल मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न केले जात असताना अमरावती जिल्ह्यात भातकुली भागातील हरताळा गावात भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आले आहे. या गावातील महिलांना चक्क पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. तसेच दोन किलोमीटर पायपीट करूनही या महिलांना गढूळ पाणी मिळत आहे.
दरम्यान संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी सदर ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.स्थानिक प्रशासनाने या पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना न आखल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार राहावे अश्या आशयाचे मनोगत कदम यांनी व्यक्त केले.
सदर भातकुली भागात नागरिकांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात नळ पाणी पुरवठा विहिरी, साधी विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे तसेच विंधन विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे अशा योजना राबविल्या जात आहे. या योजना आमच्या गावात राबवाव्यात, अशी मागणी येथील महिलांनी व नागरिकांनी केली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून भातकुली तालुक्यातील हरताळा गावात पाण्याची कठीण परिस्थिती आहे. येथील नागरिकांना पाण्यासाठी रोज वणवण प्रवास करावा लागतो. तेव्हा कुठे पाणी मिळते आणि तेही गुणवत्ता शून्य पाणी असते. त्यामुळे ते गाळून घ्यावे लागते आणि घरी जाऊन उकळावे लागते. पाणी जनावरांनी पिऊ नये म्हणून आम्ही झऱ्याला कुंपण लावून ठेवले आहे. रोज काम सोडून आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागते. तेव्हा कुठे 10 लिटर पाणी मिळते. त्यातल्या त्यात लहान मुले देखील पाणी आणण्यासाठी घेऊन जावे लागते. त्यामुळे त्यांचे शाळा व अभ्यास बुडतो हा एक मुद्दा आहे त्यामुळे लवकरात लवकर शासनाने आमची पाण्याची समस्या दूर करावी, अशी मागणी नागरिक मुकूंद बांबल यांनी केली आहे