‘निसर्गायन’ अर्थात निसर्ग प्रवास. प्रा. देवबा पाटील सरांचा कविता संग्रह वाचत असतांना निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा चित्ररूपाने डोळ्यासमोर सहज यायला लागतात. मन अचानक भूतकाळात रममाण व्हायला लागते.बालपणी शिक्षकांनी शिकविलेली बावकवी अर्थात त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांची कविता आपसुकच ओठांवर यायला लागते..
हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती..
या आणि अशा कित्येक कविता पुटपुटतच आपण लहानांचे मोठे झालो आणि निसर्गाशी एकरूप होत गेलो,खऱ्या अर्थाने निसर्ग जगत आणि अनुभवत गेलो. आता मात्र निसर्गाशी दुरावत असतानाच बालपण सुद्धा या कवितांपासून दूर झालेल आहे.,त्याची जागा ‘जाॅनी जाॅनी यस पप्पा’ ने घेतली आहे त्यामुळे बालमनाला निसर्ग अनुभवताच येत नाही हीच खंत आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात माणसाला जे समाधान मिळते ते समाधान माणूस कुठेच मिळवू शकत नाही.ग्रीष्माच्या तप्त उन्हात शेतातील झाडाखाली जो गारवा,जी मनःशांती मिळते तो गारवा, ती मनःशांती मानव निर्मित कुलर मुळे कधीच मिळणार नाही हे तेवढेच शाश्वत आहे, हे मनुष्य जाणीव पूर्वक विसरत असताना संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सुंदररित्या सांगण्याचा प्रयत्न करतात..
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षी ही सुस्वरे आळविती
प्रा.देवबा पाटील यांचा ‘निसर्गायन’ हा कविता संग्रह हेच सांगण्याचा प्रयत्न करीत असावा.अगदी साध्या आणि सोप्या शब्दात सरांच्या कविता आहेत.
प्रा.देवबा पाटील यांचा ‘निसर्गायन’ हा कविता संग्रह हेच सांगण्याचा प्रयत्न करीत असावा.अगदी साध्या आणि सोप्या शब्दात सरांच्या कविता आहेत. या कविता संग्रहाला प्रा.निरंजन माधव सरांची सुंदर आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेली आहे.ही प्रस्तावना वाचत असताना प्रा.निरंजन माधव सरांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली, ती ही की सोपेपणा हा कच्चेपणा नसून ती प्रबल- प्रमाथी – प्रभावी अशी प्रासादिक्तेचीखूण आहे, याची अनुभूती नेमके पणाने हा कविता संग्रह वाचताना येतो.
कवी आणि निसर्ग यांचे अतुट नाते आहे.निसर्गाच्या सान्निध्यात कवी आपल्या कल्पनेला शब्दरूपात गुंफत असतो.निसर्गाशी कविचे वेगळेच नाते असते. झाडांना , वेलींना जसा मोहर येतो तसाच कवी निसर्ग सौंदर्य पाहून मोहरत असतो..अशातच काही सुंदर ओळी येतात
स्वर्गाहून सुंदर आपली धरती माता
बहरलेला निसर्ग वाढवी तिची सुंदरता
कर्णमधुर गोड पाखरांचे गीत
सळसळणाऱ्या पनांचे संगीत
सर्वात सुंदर काय असेल तर कल्पनेला स्वर्ग,जो पुर्णतः काल्पनिक आहे. परंतु वास्तवात आहे ती धरतीमाता, जी निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे.हिरवे रान,पाण्याचे झरे, पक्ष्यांची चिवचिवाट,मंद वाहणारा थंड गार वारा हे सर्व स्वर्ग सुखाची अनुभूती होत असते,अशा सुंदर शब्दांत कवी निसर्गाचे वर्णन करतात.
कवीची कल्पनाच त्याच्या कवितेला वाचकांच्या मनाचा ठाव घ्यायला भाग पाडते. आकाशातील चंद्र तारे, बागेतील फुल पाखरु हे सर्वांच्याच मनाला भावतात.ते पाहतांना मनाला आनंदी झुळूक प्रसन्न करून जाते.कवी मनाचा माणूस हे चित्र आपल्या कवितेत सुंदर शब्दांत गुंफत असतो,ही शब्दरूपाची गुंफन वाचकाला आपलीशी वाटायला लागते..
शितल चंद्रमा.. मोहवी मन
भ्रमर मोहित… बघता सुमन
शीतल निर्झर… तृपतवी तहान
व्याकूळ चित्तास …गोड समाधान
‘निसर्गायन’ या कविता संग्रहाच्या प्रत्येक पानावर निसर्ग प्रवासाचा आनंद अनुभवता येतो. आकाशातील वेगवेगळ्या रंगछटा आपल्या कवितेत शब्दबद्ध करणे वाटते तेवढे सहज नाही.मलाही कविता लिहायची आवड आहे परंतु निसर्गाचे अशा सुंदर शब्दांत वर्णन करणे मला कधीच जमलेले नाही, हे मला मान्य करायलाच हवे. ही प्रतिभा प्रा.देवबा पाटील सरांच्या अंगी नैसर्गिक आहे.ते आपल्या कवितेत निसर्गाचे समर्पक वर्णन करतात ते ही सुंदर शब्दांत.ही कविता वाचल्यानंतर साहजिकच आपल्या लक्षात येईल..
सूर्य कलला
दिशा फाकल्या
रंगारंगांनी
न्हाऊन निघाल्या
लाल, गुलाबी
हिरवा,पिवळा
रंग आभाळा
निळा जांभळा
आयुष्याच्या दगदगीतून वेळ काढून ज्यांनी ज्यांनी सूर्यास्त बघितलेला असेल त्यांच्या नजरेपुढे हे दुष्य प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही.एखाद्या चित्रकाराने आपल्या कल्पनाशक्तीतून तयार केलेल्या कलाकृती समान सुंदर मनमोहक भासू लागते.निसर्गाची ही चित्रकारीता बघून मन आनंदीत झाल्या शिवाय राहत नाही.
मानवी जीवन सुंदर आहे तसेच धकाधकीचे आहे. जगण्याच्या शर्यतीत हसणे रडणे खरेखोटे यासारख्या अनेक प्रसंगांना तोंड देतच सामोरे जावे लागते. परंतु निसर्गाच्या पदरात खोटेपणा कुठेच आढळत नाही. तिथे सर्व निथळ स्वच्छ आणि सुंदर त्यामुळेच कवी म्हणतो..
वृक्षवेलीची सुगंधित सुमनं
माणसाचे मन करती प्रसन्न
मानवी मनातील कुत्सित फूल
माणसाचीच करते सदैव भूल
‘निसर्गायन’ या कविता संग्रहात निसर्ग सौंदर्य कवितेतून चित्रित करणे एवढाच कवीचा हेतू असावा हा समज कविता संग्रह पूर्ण वाचल्यानंतर खोटा ठरतो. काही कविता प्रबोधनात्मक वाटायला लागतात.
ते मानवी वर्तनावर अलगद बोट ठेवून माणसाला त्याच्या वर्तनातील चुका डोळसपणे दाखवायला लागतात. सूर्य एक, चंद्र एक, सर्वत्र वाहणारी हवा, एक पाऊस, एक निसर्ग माणसाला लागणाऱ्या गरजा समान वाटत असतो तरी माणूस भेद करतो तो माणसा माणसातच. ही खंत सहज लक्षात येते ती या कवितेतून..
निसर्गातील झाडे झुडपे
शांततेने राहतात सगळे
विविध पक्षी कितीतरी जाती गुण्यागोविंदाने सदा राहती
निसर्ग जोपासतो सदा समभाव
मानवाने घ्यावा हा धडा सदैव..
जात-पात धर्मवीर हा विषयच खूप घातक आहे. हा विषय नवीन नाही भूतकाळाच्या गर्भाशयात याची बिजे पेरली गेलेली आहे. त्यामुळे ती किती खोल आहेत याचा अंदाज घेणे सुद्धा शक्य नाही. मराठीत एक म्हण प्रचलित आहे
“कळते पण वळत नाही” असे वागणे योग्य नाही हे समजूनही मनुष्य परिस्थितीनुसार सर्व विसरत जातात. माणसाच्या अति लालसेने होणारा निसर्गाचा ऱ्हास आणि त्याचे येणाऱ्या पिढीला भोगावे लागणारे दुष्परिणाम याला आपणच दोषी आहोत, याची जाणीव असूनही निसर्ग संवर्धन आपण जाणीवपूर्वक टाळतोय. कदाचित निसर्गायन हा कवितासंग्रह वाचतांनी वाचकांना याची अल्पशातरी जाणीव होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
धरेचं ठरलं … पावसाशी लग्न
साऱ्यांना आनंद.. झाला महान
फुलं गाऊ …. लागली गाणे
पाखरांचे सुंदर तराणे
नवरदेव पाऊस …. येता सजून
धरा लाजली …. सुगंधी नटून
शिक्षक म्हटले की त्यांचे आणि मुलांचे अगदी जिवाभावाचे नाते.लहान मुलांना शिकवणारे शिक्षक तर शिकवताना स्वतः चेही बालपण जगत असतात,ते मुलांशी शिक्षक नसून त्यांच्या मित्राची भूमिका बजावत असतात त्यामुळेच ते मुलांचे आवडीचे आणि आपुलकीचे होऊन जातात. प्रा.देवबा पाटील सरांन सारखे कवी मनाचे शिक्षक असतील तर अशा सुंदर कवितेतून व्यक्त होतात.
खरे पाहता हा संपूर्ण कविता संग्रह निसर्गाला समर्पित आहे.मानवी मन कसे आणि कधी बदलेल हे सागता येत नाही.त्यामुळेच कदाचित कवी निसर्गा विषयी बोलता बोलता आपला जीवन प्रवास रेखाटायला लागतो.आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करत आपला जीवन प्रवास यशस्वी केल्याची ग्वाही कवी आपल्या कवितेतून देतो
काट्यांना सोडून … फूलेच पाहिली
पदरी जीवनात … काटेच आली
काटे तुडवत … बेजार झालो
पद पुढेच टाकत गेलो
परी मागे नाही फिरलो
सदैव पुढेच जात राहिलो
जीवन एक संघर्ष आहे यातून कुणीच सुटत नाही,हे शाश्वत आहे.
‘निसर्गायन’ या कविता संग्रहात ‘कविता’ या शिर्षकाखाली लिहीलेली सुंदर कविता वाचतांना काही प्रश्न आठवतात जे कविता लिहीणाऱ्यांना बरेचदा विचारले जातात की कविता कशी ये किंवा ती तुम्हाला सुचते कशी..यावर यावर आपण बरेचदा निशब्द होत असतो.आता मला उत्तर सापडलंय ते ही कवितेतून..ही कविता जितकी सुंदर तितकीच समर्पक आहे..
कविता उगवते
प्रभातच्या सोनेरी
किरणांतून..
कविता अंकुरते
मातीच्या काळ्या
कणाकणातून..
कविता फुलते
उगवत्या नाचऱ्या
फुलाफुलातून..
कविता निपजते
भावना, वेदना,व्यथांतून..
कविता जन्मते
कवीच्या अस्वस्थ
अंतरातून..
कविता उमलते
संवेदनशील
मनातून..
या संग्रहाचे सुंदर मुखपृष्ठ,प्रा.डाॅ काशिनाथ बऱ्हाटे सरांची सुंदर आणि अभ्यासपूर्ण शब्दात पाठराखण तसेच कृष्णायन प्रकाशनाचा सुंदर आणि निटनेटकेपणा या संग्रहाला आकर्षक बनवतात.प्रा.देवबा पाटील सरांनी जेवढ्या प्रेमाणे कविता संग्रह भेट दिला तेवढ्याच प्रेमाणे मी त्यांचे सस्नेह आभार व्यक्त करतो.या संग्रहावर व्यक्त होताना काही चुका अथवा तृटी आढळल्यास आपला विद्यार्थी समजून क्षमस्व:
कविता संग्रह..निसर्गायन
कवी …प्रा.देवबा पाटील
मुल्य..१००/
प्रकाशक ..कृष्णायन प्रकाशन, पुणे
©शरद बाबाराव काळॆ
धामणगांव रेल्वे
९८९०४०२१३५