चांदुर रेल्वे /तळेगाव/ चांदुर रेल्वे तालुक्यातील निंबा गावातील मजुर शेतात डवरणीसाठी जात असताना रस्त्यावर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने मजूर अशोक सोनोजी शेंडे (वय ४०) आणि नारायण गवई यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक अन्य मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना गुरुवार (ता. 24 जुलै 2024) रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, आज गावातील कोणताही मजूर कामावर गेला नाही.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. ते म्हणाले, “महावितरण कंपनी मेंटेनन्सच्या नावावर करोडो रुपयांची फक्त बिले काढत आहे, पण प्रत्यक्षात शेतकरी आणि मजुरांच्या जीवांशी खेळ खेळला जात आहे. कंपनी फक्त ठेकेदारांना श्रीमंत आणि गब्बर करण्याच्या मागे आहे. यामागे मोठ्या प्रमाणात कमिशनचा धंदा सुरू आहे. या निष्काळजीपणामुळे निर्दोष लोकांचे जीव गेले, याला जबाबदार कोण?” त्यांनी पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी आणि तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे पंचनामा केला. मृत अशोक शेंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यू मजुराच्या मागे पत्नी मुलगा व एक मुलगी आहे या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महावितरणच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गावकऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.