पुलगाव
स्थानिक आर. के ज्ञान मंदिरम इंग्लिश मिडीयम स्कुल, नाचनगाव, पुलगाव येथे पोळा उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात विद्येची आराध्य देवता माता सरस्वती व आर. के. ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री. रंगलालजी केजडीवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
या प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री नितिन श्रीवास यांनी बैल जोडीचे पूजन केले व त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य खाऊ घातला तसेच उपस्थित शेतकरी गड्याचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे उपस्थित सर्व पालक वर्गांनी कौतुक केले आहे. या प्रसंगी श्री भोयर सर, उपप्राचार्य आर. के. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज हे प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.श्री भोयर सर व शाळेचे प्राचार्य श्री नितिन श्रीवास यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना पोळा या सणाचे महत्त्व आपल्या ओजस्वी वाणीतून व्यक्त केले. या प्रसंगी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते. शारदा सभागृहात लहान बाल गोपाल म्हणजेच के. जी. १ ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पोळा भरविण्यात आला होता. अनेक विद्यार्थी शेतकरी, सैनिक, भगवान शिव, हनुमान अश्या विविध वेशभूषेत आले होते. विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांची वेश भूषा व त्यांनी अत्यन्त सुंदर सजवून आणलेले लाकडी व मातीचे नंदी बैल व विविध देखावे जे विविध विषय जसे की जल है तो कल है, बेटी बचाओ, बेटी पढाओ, शेतकरी सुखी तर देश सुखी, अयोध्या नगरी, रस्ता सुरक्षा, केदारनाथ धाम, वॉटर रिसोर्सेस इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांना तयार करून आणले होते जे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते व प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पोळ्याच्या निमित्ताने चॉकलेट व भेटवस्तू देण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे प्राचार्य श्री नितिन श्रीवास, पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता कोंबे यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.