धामणगाव रेल्वे :
तालुक्यातील ग्रामीण भागात मोटर पंप चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेत मोजा दाभाडा शिवारात कास्तकार पुरुषोत्तम बुगल व योगिताताई ठाकरे यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी मोटर पंपासह १०० फुट वीज केबल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री घडली. चोरट्यांनी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जोडलेली केबल कापली आणि मोटार पंप उचलून नेला. या प्रकारामुळे दोन्ही शेतकऱ्यांना मिळून हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
या घटनेपूर्वीही मंगरूळ व दस्तगीर शिवारातील कास्तकारांच्या शेतातून मोटर पंप, पाईप चोरीस जाण्याच्या अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत. चोरीच्या सलग घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्री शेतावर पाणी देण्यासाठी जाणेही धोकादायक ठरत आहे.
पोलिसांचा तपास सुरूच
या प्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपास पो.ना. सुधीर भीमराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
शेतकऱ्यांची तीव्र नाराजी
चोरीमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
शेतकरी म्हणाले –
“आमच्या शेतातील मोटार पंप चोरीला गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तातडीने उपाययोजना करून चोरांना पकडावे, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”