अमरावती, दि. 21 (जिमाका) : महिला व बालविकास विभाग हा शासनासाठी अत्यंत महत्वाचा विभाग आहे. महिलांच्या सर्वांगीण विकास आणि उत्थानासाठी शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण, चाईल्ड हेल्पलाईन, बाल विवाह प्रतिबंध, बाल संरक्षण संस्थेची त्रैमासिक सभा, कोवीडमुळे पालकत्व गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षण कृती दल सभा, पुनर्वसन समितीची त्रैमासिक सभा, अपराधी परिविक्षा अधिनियमानुसार सभा, महिला सल्लागार समितीची त्रैमासिक सभा पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, विभगीय महिला व बालविकास अधिकारी विलास मसराळे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी अतुल भडांगे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, महिलांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. यामुळे महिला विकासात योगदान देऊ शकतील. अल्पवयात लग्न, मुले होणे, घरगुती हिंसाचार यामुळे महिलांचे खच्चीकरण होत असून विभागाने महिलांकडे पाहण्याचा कल बदलविण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने बाल विवाह रोखल्यास निर्माण होणाऱ्या समस्या निकाली निघू शकतील. महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिल्यास त्या आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांना पारंपारिक प्रशिक्षणापेक्षा वेगळे प्रशिक्षण देण्यात यावे.
येत्या पिढीला अंमली पदार्थापासून वाचविणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी कार्यवाही वाढवावी. शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी खातरजमा करावी. तसेच मुलांसाठी असलेल्या चाईल्ड हेल्पलाईनची माहिती प्रत्येक शाळेत देण्यात यावी. अल्पवयीन मुलांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना त्याची माहिती बाल संरक्षण कक्षास देण्यात यावे. यामुळे त्यांचे समुपदेशन होऊ शकेल. रेल्वेस्टेशनप्रमाणे महत्वाच्या बसस्थानकावरही मुलांसाठी मदत कक्ष उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या.
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिलांच्या उद्योजकतेला वाव देण्यात येत आहे. त्यांच्यातर्फे निर्मित वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे महिलांमध्ये उद्योजकता वाढावी यासाठी आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा उपयोग करून घ्यावा. महिलांच्या विकासाठी विभाग म्हणून भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यामुळे येत्या काळात परिणामकारक ठरतील, अशा कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.