धामणगाव रेल्वे : येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये दिनांक १२ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‘खेळ पैठणीचा’ या विशेष उपक्रमासह भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांच्या संकल्पनेनुसार समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ‘नवदुर्गा’ स्वरूपातील नऊ कर्तृत्ववान महिलांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. समाजसेवा, आरोग्य, शिक्षण, कायदा, प्रशासन आदी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या या महिलांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती राधा गोपाल भूत व श्रीमती पसारी (धामणगाव रेल्वे) यांची मान्यवर उपस्थिती लाभली. तसेच पीएसआय श्रीमती सोनाली राठोड (दत्तापूर पोलीस स्टेशन), डॉ. मृगया राहुल पोकळे (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, शासकीय रुग्णालय निबोरा बोडखा), अॅड. श्रीमती नंदा शैलेश हेडाऊ (क्रिमिनल लॉयर), श्रीमती सुजाता गजभरे, श्रीमती राधिका गिरीश ताठोड आणि प्रा. श्रीमती योगिता परेश डागा (आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे) या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेला ‘खेळ पैठणीचा’ हा उपक्रम विशेष उत्साहात पार पडला. महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित महिलांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक रंगतदार केला.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्रीमती प्रज्ञा चवरे, द्वितीय पारितोषिक श्रीमती योगिता डागा तर तृतीय पारितोषिक श्रीमती सुजाता गजभरे यांनी पटकावले. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह म्हणून पैठणी प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच उपविजेत्या म्हणून श्रीमती स्नेहा शंभरकर श्रीमती रुपल कांकरीया, श्रीमती विभा गवांडे, श्रीमती माधुरी उजवणे आणि श्रीमती रश्मी ठाकूर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिलांचे समाजातील अनन्यसाधारण योगदान अधोरेखित केले. आजच्या आधुनिक काळात महिला शिक्षण, प्रशासन, विज्ञान, क्रीडा, उद्योग तसेच सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत महिलांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असून त्यांच्या कर्तृत्वामुळे समाज अधिक सक्षम व समृद्ध होत आहे, असे त्या म्हणाल्या. महिलांच्या सामर्थ्य, कर्तृत्व आणि त्यागाचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असून महिलांना समान संधी, सन्मान आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करू शकतात, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपाला डांगे यांनी अत्यंत उत्कृष्ट व प्रभावीपणे केले. त्यांच्या ओघवत्या वाणीमुळे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. कार्यक्रमातील प्रत्येक टप्प्याची त्यांनी सुंदर व नेटक्या शब्दांत मांडणी केली. मान्यवरांची प्रभावी ओळख, उपक्रमांचे सुबक सादरीकरण आणि कार्यक्रमातील समन्वय यामुळे उपस्थितांनी त्यांच्या सूत्रसंचालनाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाचे आयोजन रेड हाऊसच्या वतीने करण्यात आले होते. रेड हाऊस प्रभारी निशिकांत ठाकरे आणि साक्षी शिंदे, उपप्राचार्य तुषार रेवतकर, प्रशासकीय अधिकारी प्रितेश जनवाडे, प्री-प्रायमरी हेड शबाना खान , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या योगदानाने पार पडला.
उपस्थित महिला, पालक, यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.











