जळगाव मंगरूळ / प्रतिनिधी :
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, जळगाव मंगरूळ येथे आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. विलास भाऊ धनवीज यांनी शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी साऊंड सिस्टिम भेट दिली.
तसेच सविताताई धनवीज यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, मुख्याध्यापिका श्रीमती जाचक मॅडम, शिक्षकवृंद, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने विलास भाऊ धनवीज व सविताताई धनवीज यांच्या या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, समाजातील जबाबदार नागरिकांनी पुढे येऊन शिक्षणासाठी हातभार लावावा, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
















