चांदुर रेल्वे – (ता. प्र. )
चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड परिसरात रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसला यात मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे येरड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या झिबला येथील दोन घरावरील टीनपत्रे सहित पूर्णतः छप्पर उडाले असून खरबी मांडवगड येथील एका घरावरील टीनपत्रे उडाली.
प्राप्त माहितीनुसार रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आलेल्या पावसासह चक्रीवादळामुळे झिबला येथील रुखसाना युसुफ शहा, राहुल रामदास केवट यांचे दोन घरावरील पुर्णतः टिनपत्रे सहित छप्पर उडाले. याशिवाय खरबी मांडवगड येथील अंकुश संतोष सोनबावने यांचे घरावरील टीनपत्रे उडाली. यामुळे घरातील धान्य व सामानासह इतर वस्तू पाण्यात ओल्या झाल्या. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. छप्पर उडालेल्या घरातील व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने मोठी जिवितहानी टळली. आमचे घरावरील छप्पर उडाल्यामुळे शासनाने आम्हाला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त रुखसाना युसुफ शहा, राहुल रामदास केवट व अंकुश सोनबावणे यांनी केली आहे.
सदर नुकसानीची माहिती येरड येथील सरपंच प्रशांत देशमुख पोलीस पाटील प्रतिभा देशमुख यांनी प्रशासनाला दिली. यावेळी येरड येथील पत्रकार संजय डगवार, पुरुषोत्तम देशमुख, विजय बावणे, प्रल्हाद सोनोने उपस्थित होते.