धामणगाव रेल्वे,ता.१३:- येथील अष्टविनायक गणपती मंदीराचा वर्षपूर्ती सोहळा व रक्तदान शिबिर संपन्न झाले.यात आईने रक्तदान करून आपल्या मुलाला श्रध्दांजली अर्पण केली.याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उत्तराखंड येथिल चार धाम दर्शनासाठी मित्रासोबत गेलेल्या विक्की झेले या युवकाचा ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने केदारनाथ जवळील सोनप्रयाग येथे आकस्मित मृत्यू झाला होता.त्याची वर्षपूर्ती होती. यानिमित्ताने रक्तदान शिबिर व अष्टविनायक गणपति मंदीराची सुद्धा वर्षपूर्ती सोहळा असल्याने रक्तदान शिबिर घेऊन यामधे स्व.विक्की रमेश झेले यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिरात श्रीमति संगिता रमेश झेले यांनी रक्तदान करून आपल्या मुलाला आदरांजली वाहली तसेच अष्टविनायक गणपती मंदीराच्या अध्यक्षा रिता राजु निस्ताने यांनी रक्तदान करून आदरांजली अर्पण केली. तसेच ५१ रक्तदात्यांनि रक्तदान करून आदरांजली अर्पण केली.
गणपती मंदीर प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक कार्याला यवतमाळ येथिल डाॅ.शिवशंकर भताने, मेघराज राऊत व त्यांचे सहकारी तसेच आशा वकॅर उषा राऊत,मिना गुजर, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करन्यात आले. सायंकाळी सुप्रसिद्ध कीर्तनकार कांचन शेळके यांचा किर्तनाचा कार्यक्रम पार पडला.शहरातून भव्य मिरवणुक व दिंडी काढण्यात आली.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.याचा भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माधुरी मोहन तायडे,मिना प्रविण गुजर,रेखा खुशाल गावंडे, लक्ष्मी तुलसिदास पापडे, आरती अरूण बोरकर, राजु निस्ताने,गिरीश गावंडे, प्रविण पुणसे,अनिल लांबट, मिलींद देशमुख, सागर कदम, किरण बढीये व आदींनी परिश्रम घेतले.