अमरावती, दि 11 .राष्ट्रीय सेवा योजना तसेच रेड रिबन क्लब यांच्या माध्यमातून आरोग्याच्या योजना ग्रामीण भागात पोहचविण्याचे उद्दिष्ट प्रत्येक महाविद्यालयांनी ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकरी सौरभ कटियार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय साखरे, क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, पीसीपीएनडीटीच्या प्रणिता भाकरे, जिल्हा सल्लागार डॉ. मंगेश गुजर , समर्पण ट्रस्टचे पवन निंभोरकर तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्री. कटियार म्हणाले, एड्सबाबत विविध स्तरावरून जनजागृती करण्यात येत आहे. 15 मे व 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत इन्डेक्स टेस्टिंग मोहिम जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये जे एचआयव्ही संक्रमित आहेत, त्यांच्या संक्रमणाची उगमस्थान शोधण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील संक्रमित व्यक्तीच्या संलंग्नित व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 42 एचआयव्ही संक्रमित आढळले. या सर्वांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयीन स्तरावरून विविध पथनाट्य, कार्यक्रम, योजना यांच्या माध्यमातून एड्सबाबत जनजागृती करण्यात यावी.
लिंग परीक्षण कायद्याविषयी ग्रामीण भागात जनजागृती करण्यावर भर द्यावा.यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने सोनोग्राफी केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करावी. या कायद्याची व्याप्ती वाढवण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग तसेच अन्य संबंधित विभागांना समाविष्ट करून ग्रामीण भागात विशेष जनजागृती करावी, असे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
‘तंबाखूमुक्त गाव’ भविष्यात करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी पवन निंभोरकर यांनी तृतीयपंथीयांच्या येणाऱ्या अडचणी नमूद केल्या. तृतीयपंथीयांकडून त्यांच्या अडचणींबाबत प्रस्ताव मागविण्यात आले असून संबंधित विभागांना त्यावर कार्यवाही करण्याची सूचना श्री. कटियार यांनी दिल्या.