स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये “हिंदी दिवस” उत्साहात साजरा.

0
99
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :

स्थानिक श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्थेतर्फे संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये १३ सप्टेंबर २०२४ रोजी “हिंदी दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी होत्या.

हिंदी दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना भारताच्या राष्ट्रभाषेचे महत्त्व आणि हिंदी साहित्याची ओळख करून देणे हा होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कथा लेखन स्पर्धा, पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुच्छेद लेखन स्पर्धा, तर सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांसाठी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सोप्या भाषेत आपले विचार मांडणे, हिंदी भाषेचे महत्त्व समजणे आणि बोलीभाषा व साहित्यिक भाषेतील फरक शिकणे, हा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या दरम्यान विजेत्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सहावीतील विद्यार्थिनी आरोही पाटील हिने “हिंदी दिवस का आणि कधी साजरा केला जातो” यावर मार्गदर्शन केले. हिंदी शिक्षिका उज्वला गावंडे यांनी विद्यार्थ्यांना एक बोधपर कथा सांगून वक्तृत्व कलेची महत्त्वपूर्ण शिकवण दिली. तर, हिंदी शिक्षिका चंचल इंगोले यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व सांगत प्रत्येक कार्य वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या समारोपात प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी हिंदी कवी कबीर दास यांच्या नीतिपर दोह्यांचा उल्लेख करत त्यांच्या विचारांची आजच्या जीवनात असलेली आवश्यकता सांगितली. तसेच, आदर्श मूल्यांचे पालन कसे करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहावीतील माही बारुलकर हिने केले, तर आभार प्रदर्शन कनक पालीवाल हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad