धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी
ग्लोबल गोल्ड टॅलेन्ट बुक ऑफ रेकॉर्ड, नवी मुंबई यांच्या विद्यमाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव करण्यासाठी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सदर पुरस्कार सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 450 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधून फक्त महाराष्ट्रातून 30 पुरस्कारार्थ्यांची यांच्या संस्थेतर्फे निवड करण्यात आली होती.
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वेचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांची संपूर्ण विदर्भातुन एकमेव “एज्युकेशनल अँड आर्टिस्ट” या विभागामधून निवड करण्यात आली व त्यांना “राष्ट्रस्तरीय इंडियन एज्युकेशनल एक्सेलन्स अवॉर्ड ” -2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कलाशिक्षक अजय जिरापुरे हे विद्यालयात विदयार्थ्यांना देत असलेले नावीन्यपूर्ण कलेचे शिक्षण,कलेचे विविध उपक्रम, कलाविषयक विविध स्पर्धा, विद्यालयातील फलक लेखन, कलेमधील सातत्य व कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, मार्गदर्शन व चित्रांच्या माध्यमातून समाज जनजागृती या कार्याचा गुणगौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले..
हा पुरस्कार सोहळा दिनांक- 10 मार्च 2024 / रविवार रोजी आगरी समाज मंगल कार्यालय, कामोठे,नवी मुंबई येथे प्रमुख पाहुणे टी.व्ही.9 च्या मराठी सूत्रसंचालिका निकिता पाटील, विश्वविख्यात जादूगार सतीश देशमुख, डी.सी.पी. अमरावती डॉ.दत्ताराम राठोड यांच्या हस्ते कलाशिक्षक अजय जिरापुरे यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व गोल्ड मेडल देवून पुरस्कृत करण्यात आले.
अजय जिरापुरे यांचा झालेला गुणगौरव निमित्त धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य गोपाल मुंधडा, पर्यवेक्षक प्रा. प्रदीप मानकर व तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे..