धामणगाव रेल्वे येथे भव्य महामाता आई रमाई जयंती महोत्सव उत्साहात; भारतरत्न बहाल करून अधिकृत राष्ट्रीय पातळीवर जयंती साजरी करण्यात यावी – वैभव बावनकुळे यांची ठाम मागणी

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) येथे जय संविधान ग्रुप व विवेक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महामाता आई रमाई जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत मून होते, तर प्रमुख अतिथी म्हणून वैभव अरुणराव बावनकुळे उपस्थित होते.

कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी महामाता आई रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आपल्या ओजस्वी भाषणात वैभव बावनकुळे यांनी महामाता आई रमाई यांच्या त्यागमय जीवनकार्याचा गौरव करत ठाम भूमिका मांडली. “परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव घडविण्यामागे महामाता आई रमाई यांचे मोलाचे योगदान आहे. बाबासाहेबांच्या महान कार्यामागे त्यांचा त्याग, संयम आणि संघर्ष हीच खरी शक्ती होती. त्यामुळे त्या या राष्ट्राच्या मुख्य शिल्पकार आहेत,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
याच अनुषंगाने त्यांनी शासनाकडे जोरदार मागणी केली की, महामाता आई रमाई यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ बहाल करण्यात यावा तसेच त्यांची जयंती अधिकृतरीत्या राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्यात यावी.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले, “मी भारतीय संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सर्व लोकप्रतिनिधींना थेट निवेदन देणार आहे. त्यासोबत महामाता आई रमाई यांचे जीवनचरित्र आणि समाजासाठी केलेल्या त्यागाचे पुस्तक त्यांना सुपूर्द करून संसदेत हा विषय उपस्थित करण्याची विनंती करणार आहे, जेणेकरून त्यांना ऐतिहासिक आणि योग्य तो सन्मान मिळावा.”
त्यांच्या या ठाम भूमिकेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जोरदार टाळ्यांच्या गजरात समर्थन दर्शविले. घोषणांनी परिसर दुमदुमला आणि जयंती महोत्सव प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad