चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात बुधवारी तिसऱ्या दिवशी संगीतमय शिवमहापुराण कथेच्या प्रवचनात विदर्भ कन्या ह.भ.प. वैभवश्रीजी पांडे (वृंदावन) यांनी भाविकांना अध्यात्मिक साधनेचा मूलमंत्र दिला.
पहिल्या सत्रात प्रवचन करतांना वैभवश्रीजी म्हणाल्या की, “ही श्री संत बेंडोजी महाराजांची संजीवन समाधी असून, घुईखेडचे महात्म्य आळंदीइतकेच मोठे आहे. या पुण्यभूमीहून प्रत्येकाने शक्ती, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन जावी, तर जीवनातील कार्य सिद्धीस जाते.”
श्री संत बेंडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घुईखेड नगरीत दररोज दोन सत्रांत शिवमहापुराण कथा सुरू असून, या कथेमध्ये अध्यात्मिक उन्नतीसह जीवनातील यशाचा मार्गही उलगडून सांगण्यात येत आहे. शिवपुराण हे केवळ कथा नसून ते साधना पर्व असल्याचे सांगत वैभवश्रीजी पांडे म्हणाल्या, “जसे डॉक्टर व्हायचे असेल तर कठोर परिश्रम करावे लागतात, तसेच जीवनात यश, मनःशांती आणि समाधान मिळवण्यासाठी साधना, सेवा व सत्संग आवश्यक आहे.” या प्रवचनामुळे भाविकांमध्ये भक्तिभावाबरोबरच आत्मचिंतनाची भावना निर्माण झाली असून, घुईखेड येथील संजीवन समाधी सोहळा हा केवळ धार्मिक नव्हे तर जीवनाला दिशा देणारा अध्यात्मिक महाउत्सव ठरत आहे. सप्ताहाच्या मागील ३ दिवसांत भाऊसाहेब घुईखेडकर, वसंतराव घुईखेडकर, हिम्मतराव नाचणे, निकेश येवले, नितेश पवार, संतोष बनकर, किशोर पवार, गिरीष भारसाकडे, डॉ. राजेंद्र ठाकुर, भिमराव वानखडे, विजय देशमुख यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले.














