अमरावती, दि. 22 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक अमरावती येथे दाखल झाले आहे. व्यंकन्ना तेजावत आणि श्रीमती उमा माहेश्वरी यांचे आज अमरावती आगमन झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च समितीच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, खर्च समितीचे नोडल अधिकारी विजय देशमुख आदी उपस्थित होते. खर्च निरीक्षक व्यंकन्ना तेजावत यांच्याकडे 36 – धामणगाव रेल्वे, 37 – बडनेरा, 38- अमरावती, 39 – तिवसा आणि श्रीमती उमा माहेश्वरी यांच्याकडे 40 – दर्यापूर, 41 – मेळघाट, 42 – अचलपूर, 43 – मोर्शी या मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
श्री. तेजावत यांनी खर्च समितीकडून जिल्ह्याचा आढावा घेतला. प्रामुख्याने ज्या बाबींवर उमेदवारांकडून आक्षेप नोंदविला जातो, अशा बाबींचा खर्च नोंद करताना काळजी घेण्यात यावी. तसेच उमेदवारांच्या रॅली, प्रचारसभा यांच्यावर होणारा खर्च नोंदविताना खबरदारी घ्यावी. याबाबत आक्षेप येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्हा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती दिली. निवडणुकीसाठी फिरते पथक, स्थिर पथक, व्हीडीओ पथक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून ही सर्व पथके कार्यान्वित झाली आहे. पथकात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचारी-अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती दिली.
Home आपला विदर्भ अमरावती विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक दाखल *जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षांना भेटी *खर्चाच्या समितीकडून आढावा