समाजानेही राष्ट्रभक्ती, संस्कृती,
संस्काराचा जागर करावा
धामणगाव रेल्वे, २४ फेब्रुवारी
समाजामध्ये चांगले भाव, चांगली संस्कृती, उत्तम संस्कार, राष्ट्र भक्ती, योग्य परिवर्तन करण्याचे कार्य केवळ संघाचेच नसून, संपूर्ण समाजाने समोर येऊन हे कार्य करणे अभिप्रेत आहे. तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे, या ध्येयानुसार आपल्याला भारताची व संपूर्ण समाजाची उत्तम निर्मिती करायची आहे. संघाचे नाव इतिहासात नोंदविले गेले नाही तरी चालेल, परंतु संघ कार्यक्रमानेच समाजात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. ते धामणगावच्या नवोत्थान २०२४ या प्रकट कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यापीठावर प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, अमरावती जिल्हा संघचालक विपिन काकडे, धामणगाव तालुका संघचालक गजानन पवार आणि चांदूर तालुका संघचालक मनोज मिसाळ उपस्थित होते. धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवक तसेच नागरिक बंधू-भगिनींना उद्बोधन करताना डॉ. भागवत म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी सुद्धा बंधुभाव टिकून राहावा असे संविधान आपल्याला दिले आहे. याच संविधानानुसार आपल्या सर्वांना भारत मातेचे पुत्र म्हणून कार्य करायचे आहे.
ज्याप्रमाणे श्रीराम अयोध्येत आले त्याचप्रमाणे रामाची संस्कृती, संस्कार, आचरण हे सुद्धा प्रत्येकाच्या जीवनात येणे गरजेचे आहे. समाजामध्ये अस्पृश्यतेचा भाव नकोच. इतिहासात अनेक उतार-चढाव आले, परंतु आपली प्राचीन संस्कृती कधीच, कोणी मिटवू शकले नाही. कारण आपण एखाद्यावेळी आपसात भांडण करीत असलो तरी जेव्हा राष्ट्राचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी आमचे राष्ट्र एक राहो, असा भाव, अशी देशभक्ती आपल्यामध्ये निर्माण होते, हे उल्लेखनीय, असल्याचे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले.
भारतावर अनेक आघात आले, परंतु आम्ही सर्व मिळून लढलो आणि प्रत्येक आघातातून बाहेर निघालो. खरे तर आपण आता स्व तंत्राने जीवन जगणे शिकलो आहे. सर्व जगाला धर्म आणि दिशा देण्याचे कार्य भारताने केले आहे. आपली प्रगती भौतिक आणि अध्यात्मिकतेत नव्हे तर राष्ट्र एक राहण्यामध्ये आहे. भारत देशाची भक्ती हा सुद्धा एक मूळ मंत्र आहे. संस्कारयुक्त संस्कृती जगणे हा सुद्धा एक मूळ मंत्र असल्याचे ते म्हणाले. प्रगती करण्याकरिता एकता हवी. हिंदुत्व म्हणजे सर्व एक निष्ठ भावना, संस्कार, संस्कृती, विचार आणि देशाप्रती राष्ट्रभक्ती, असाच आहे. हिंदुत्वाचा विचार भाषणातून नव्हे तर आचरणातून शोधण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी शोधले आणि संघाची स्थापना केली. केवळ उपदेशानेच सारे होत नाही तर तशी वागणूक, आचरण आवश्यक आहे. आपले राष्ट्र देश मोठे व्हावे याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सतत उठाठेव असतेच. हे कार्य केवळ संघाने नव्हे तर समाजाने करणे अपेक्षित आहे, याकडेही डॉ. भागवत यांनी लक्ष वेधले.
डॉ. भागवत म्हणाले की, महाभारतातील युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाकरिता चीनपासून तर सायबेरीयन उपस्थित होते, असा उल्लेख इतिहासात येतो. बालक-पालक संवाद बंद झाला आहे, तो सुरू व्हावा, असे कुटुंब प्रबोधन सुद्धा त्यांनी केले. मोहनजींनी पर्यावरण वाचविण्याचाही सल्ला दिला.
सर्व स्वयंसेवकांना आता जास्त वेळ देण्याची गरज आहे. प्रवासी आणि दायित्वधारी स्वयंसेवकांनी त्याही पेक्षा जास्त वेळ द्यावा. ज्याला जमत असेल त्या स्वयंसेवकांनी पूर्ण वेळ संघाला द्यावा आणि अन्य स्वयंसेवकांनी दररोज संघाच्या एका तासाच्या शाखेत येणे आवश्यक असल्याचेही सरसंघचालक संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
कार्यक्रमापूर्वी बाल घोषाचे प्रात्यक्षिक, व्यायाम योग सादर करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांकरिता संघ पुस्तक प्रदर्शन सुद्धा लावण्यात आले होते. नवोत्थान २०२४ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी जिल्हा संघचालक विपिन काकडे यांनी पार पाडली.