प्रतिनिधी: धामणगांव रेल्वे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांतर्गत तिरंगा उपक्रमांतर्गत 12 ऑगस्ट 2025 रोजी नगरपरिषद धामणगाव रेल्वेच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नगरपरिषद अंतर्गत नगरपरिषदेच्या सर्व शाळा, खाजगी अनुदानित शाळा सहभागी झाल्या होत्या. रॅलीला सुरुवात श्री छत्रपती शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्याधिकारी पुनम कळंबे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. ही रॅली शास्त्री चौक, मार्ग होत शहरातील मुख्य रस्त्यावरून गांधी चौक येथे आली. महात्मा गांधीजीच्या पुतळ्याला उमेश गोंडीक प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग नगरपरिषद धामणगांव रेल्वे यांनी हार अर्पण करून, पुढे हि रॅली आठवडी बाजार येथून मार्गक्रमण करीत अमर शहीद भगतसिंग चौक येथे पोहोचली. तिथे अमर शहीद भगतसिंगांच्या पुतळ्याल हार अर्पण करून , हर घर तिरंगा
या अभियानाचे महत्त्व विशद करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी यांनी विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता या अभियानाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी पर्यावरण स्वच्छतेची शपथ सर्व विद्यार्थ्यांना उमेश गोंडीक यांनी दिली. या रॅलीत नगरपरिषद स्वच्छता विभागाचे आरोग्य निरीक्षक आकाश सोनेकर, प्रकल्प अधिकारी किशोर बागवान, बांधकाम विभागाचे अभियंता शेखर ढबाले, लेखा विभागाचे मनोज भालेराव, रत्नेश खडसे, ग्रंथालय विभागाचे प्रमुख अविनाश डगवार, विजय कोकाटे, सर्व अधिकारी कर्मचारी यांनी रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीला दत्तापूर पोलीस स्टेशन, व ग्रामीण रुग्णालय यांनी विशेष सहकार्य केले. या सायकल रॅली मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांना प्रमाणपत्र मुख्याधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. या रॅलीत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे धामणगांव नगरपरिषद यांच्यावतीने आभार मानण्यात आले.