तिवसा – तालुक्यातील ग्रामीण भागात रोजगार हमी योजना अंतर्गत होणाऱ्या वैयक्तिक लाभासह सार्वजनिक कामांचा लेखाजोखा व समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन प्रशासनाकडून सहा महिन्यांपासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यात ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामावर आधारित अनिश्चित मानधनावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. तसा शासन निर्णयही निघाला मात्र आज अखेर ग्रामरोजगार सेवकांना मानधनच मिळाले नाही.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जबाबदारी गावपातळीवर सरपंच आणि ग्रामसेवकांवर देण्यात आली आहे. या कामात ग्रामपंचायत स्तरावर अभिलेख आणि नोंदवह्या ठेवण्यासाठी मदत करण्याची आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची अर्धवेळ स्वरूपात नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ग्राम रोजगार सेवकांना अकुशल कामावर मनुष्य दिवसांच्या मजुरी खर्चावर
आधारित मानधन देण्यात येत होते. ज्या गावात जास्त काम त्या गावातील ग्राम रोजगार सेवकांना चांगले मानधन होते. तर ज्या गावात कमी काम त्या गावातील ग्राम रोजगार सेवकांना तुटपुंजे मानधन मिळत होते. मात्र शासनाने ग्राम रोजगार सेवकांना महिन्याला आठ हजार रुपये निश्चित मानधनाचा निर्णय घेतला. तसा शासन निर्णय ३ आक्टोबर २०२४ ला काढण्यात आला. या निर्णयामुळे ग्राम रोजगार सेवकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक सिंचन विहीर,
फळबाग लागवड योजना यासह इतर कामे व पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना त्याचबरोबर शौचालय ही सर्व विविध कामे करून घेणे, त्यावर लक्ष ठेवून प्रशासन व लाभार्थ्यांमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडून संबंधित घटकासाठी असलेले अनुदान लाभार्थ्याच्या पदरात पाडून देणे, यासह विविध कामे ग्राम रोजगार पार पडतात. परंतु या ग्रामरोजगार सेवकांना कामाच्या मोबदल्यात मिळणारे तुटपुंजे मानधनही सहा महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे या ग्राम रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत पंचायत समितींना वारंवार कल्पना
देऊनही मानधन मिळत नसल्याने हे ग्राम रोजगार सेवक हताश झाले आहेत. राज्य सरकारने लक्ष देऊन तत्काळ सहा महिन्यांपासून थकीत मानधन देण्यात यावे, अशी मागणी ग्राम रोजगार सेवक संघटना वणी यांचे वतीने करण्यात आली आहेत. सदर शासन निर्णयानुसार सर्व रोजगार सेवक यांना मानधन देण्यात यावे त्या अनुषंगाने तिवसा येथील रोजगार सहायक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा पुढील हप्त्यामध्ये देण्यात येणार आहेत यावेळेस तिवसा रोजगार सहायक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
रुपेश चौधरी ग्रामपंचायत वऱ्हा
तालुका अध्यक्ष ग्रामरोजगार सेवक संघटना तिवसा