चांदूर रेल्वे /मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत घुईखेड येथे विविध लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानाअंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले असून,नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
याच कालावधीत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महिलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करून त्यांना विविध प्रशिक्षण योजनांची माहिती देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली,तर पशुधनाच्या आरोग्यासाठी पशुवैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.तसेच आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आणि महिलांची स्वतंत्र आरोग्य तपासणीही करण्यात आली.
या सर्व उपक्रमांची पाहणी करण्यासाठी चांदूर रेल्वे पंचायत समितीचे नोडल अधिकारी मल्ला तोडकर (कृषी विकास अधिकारी,जिल्हा परिषद अमरावती),गजानन गिरे (कृषी अधिकारी,पंचायत समिती चांदूर रेल्वे),नरेंद्र मेहरे (विस्तार अधिकारी कृषी),रमेश मेश्राम (विस्तार अधिकारी) तसेच राहुल गवई यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामपंचायत घुईखेडला भेट देऊन कामांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन व सुधारित योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या पाहणीप्रसंगी अर्चना शिलनकर (ग्राम सदस्य),संगीता गिरूळकर (ग्राम सदस्य) तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.















