अमरावती, दि. 01 : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातील महिलांचा सहभाग राहणार आहे. या मेळाव्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला व बाल विकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी कार्यक्रम आयोजनाचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या ठिकाणी बैठक क्षमतेएवढ्याच लाभार्थी महिला बोलावण्यात याव्यात. संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व या कार्यक्रमात यावे, यासाठी प्रत्येक तालुकास्तरावरून एक बस येईल, असे नियोजन करण्यात यावे. लाभार्थी आणण्याची जबाबदारी सोपविलेल्या यंत्रणांनी लाभार्थी निवडताना युवा लाभार्थी प्रामुख्याने निवडावेत. जवळच्या भागातील जास्त लाभार्थी आणण्यावर भर देण्यात यावा. प्रवासादरम्यान त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमात महिला आर्थिक सारक्षता, सुरक्षा आणि रोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यात यावे.
कार्यक्रमाचे आयोजन सायंसस्कोर मैदानावर होणार आहे. याठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी. प्रामुख्याने महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पुरेशा फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. याठिकाणी मुबलक पाणी पुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी. कार्यक्रम अधिक वेळ सुरू राहणार असल्याने लाभार्थ्यांच्या नास्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य पथक तैनात करण्यात यावे. याठिकाणी लाभार्थी मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने शासकीय योजनांचे स्टॉल लावण्यात यावेत.