अमरावती, दि. 30 07- अमरावती लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीसाठी लोकशाही भवन परिसरात जय्यत तयारी केली जात असून सुरक्षितेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज प्रत्यक्ष लोकशाही भवनला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राची पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
दि. 26 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, अमरावती येथे सुरु होणार आहे. 07-अमरावती लोकसभा मतदार संघात एकूण 6 विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 18 टेबल याप्रमाणे 108 टेबल मतमोजणीसाठी लावण्यात येणार आहे. तसेच पोस्टल बॅलेट पेपर मतमोणीसाठी 10 टेबल व इटीपीबीएमएस स्कॅनिंग साठी 8 स्कॅनर लावण्यात येणार आहेत.
मतमोजणीसाठी प्रत्येक मतदार संघनिहाय 18 टेबलवर 18 मतमोजणी पर्यवेक्षक व 18 मतमोजणी सहायक तसेच सुक्ष्म निरीक्षक 18, शिपाई 18 याप्रमाणे एकूण 6 मतदार संघासाठी 108 मतमोजणी पर्यवेक्षक व 108 मतमोजणी सहायक, सुक्ष्म निरीक्षक 108, शिपाई 108 याप्रमाणे 432 कर्मचारी मतदान कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच इतर कामासाठी 500 कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी 500 असे एकूण 1500 कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी हॉलमध्ये इव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीसाठी 108 व इटीपीबीएस व पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी 10 प्रतिनिधी असे एकूण 118 प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधीसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
37-बडनेरा विधानसभा मतदार संघासाठी 337 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहे. 38- अमरावती विधानसभा मतदार संघासाठी 322 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहे. 39-तिवसा विधानसभा मतदार संघासाठी 319 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहे. 40-दर्यापूर विधानसभा मतदार संघासाठी 342 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहे. 41-मेळघाट विधानसभा मतदार संघासाठी 309 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहे. 42-अचलपूर विधानसभा मतदार संघासाठी 354 मतदान केंद्र असून मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्या होणार आहे. असे एकूण सहा विधानसभा मतदार संघासाठी एकूण 1 हजार 983 मतदान केंद्र असून 112 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत.
मतमोजणीसाठी मतमोजणी हॉलमध्ये कम्युनिकेशन कक्ष, मीडिया कक्ष, उमेदवार कक्ष स्थापन केलेला असून सर्व कक्ष सुसज्ज आहेत. वीज पुरवठा अखंड सुरु राहावा यासाठी युपीएस व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडणार आहे.
07- अमरावती लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी
07- अमरावती लोकसभा मतदार संघाचे मतदान दि. 26 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदानानुसार 37- बडनेरा मतदारसंघात एकूण 3 लक्ष 38 हजार 079 मतदार असून 1 लक्ष 88 हजार 594 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 55.78 टक्के एवढी झाली आहे. 38- अमरावती मतदारसंघात एकूण 3 लक्ष 46 हजार 416 मतदार असून 1 लक्ष 99 हजार 242 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 57.52 टक्के एवढी झाली आहे. 39-तिवसा मतदारसंघात एकूण 2 लक्ष 84 हजार 256 मतदार असून 1 लक्ष 82 हजार 313 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 64.14 टक्के एवढी झाली आहे. 40-दर्यापूर मतदारसंघात एकूण 2 लक्ष 99 हजार 620 मतदार असून 2 लक्ष 003 हजार 84 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 66.88 टक्के एवढी झाली आहे. 41-मेळघाट मतदारसंघात एकूण 2 लक्ष 86 हजार 890 मतदार असून 2 लक्ष 05 हजार 284 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 71.55 एवढी झाली आहे. 42-अचलपूर मतदारसंघात एकूण 2 लक्ष 80 हजार 817 मतदार असून 1 लक्ष 93 हजार 304 मतदार झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 63.67 एवढी झाली आहे. असे एकूण 18 लक्ष 36 हजार 078 मतदार असून 11 लक्ष 69 हजार 121 मतदार झाले आहे. या मतदानाच एकूण टक्केवारी 63.67 टक्के एवढी आहे.