चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी
संपूर्ण जगातील नष्ट झालेल्या सुमारे ८० ते ८५ टक्के वनसंपदेचे पुनरुज्जीवन होऊन त्यांवर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीची पुनर्निर्मिती होणे व जगभरात युद्धास्तरावर वृक्षलागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाचा झालेला असमतोल दूर दूर करणे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने सन्मानित रघुनाथ ढोले पाटील संस्थापकअध्यक्ष असलेल्या देवराई फाउंडेशन, पुण्याच्या अमरावती शाखेने यावर्षी अमरावती जिल्ह्यात १० हजार बीज गोळे (सीडस् बॉल्स) लावण्याचा संकल्प केलेला आहे.
सीडस् बॉल किंवा सीड बॉम्ब हे बॉलच्या मध्यभागी ठेवलेले बिया असतात. ज्यात चिकणमाती, माती, शेण आणि कंपोस्ट असते. चिकणमाती आणि बुरशी बॉल बियाणे सूर्यप्रकाशात कोरडे होण्यापासून, उंदीर आणि पक्ष्यांसारख्या भक्षकांना खाण्यापासून किंवा उडून जाण्यापासून प्रतिबंधित करते. चिकणमातीमध्ये पुरेसा पाऊस पडला की, बिया त्याच्या मिश्रणाच्या मदतीने उगवतात.
सीडस्बॉल सामान्यतः फक्त फेकून किंवा इच्छित लागवड क्षेत्रात मातीच्या पृष्ठभागावर ठेवून लावले जातात. पाऊस, वारा आणि सूर्य यांसारखे नैसर्गिक घटक सीडस् बॉलचा बाहेरील थर तोडण्यास मदत करतात. ज्यामुळे बिया आत उगवतात आणि वाढतात. विविध प्रजातींपैकी ५-१० प्रजातींच्या बियाण्यांपासून बीज गोळे (सीडस् बॉल्स) तयार करण्याचे निर्माण कार्य पुणे येथे सुरू झालेले असून देवराई फाउंडेशन पुणे यांच्याद्वारे हे। बीज गोळे जून महिन्याच्या मध्यानंतर देवराई अमरावतीला रोपणाकरिता विनामूल्य दिल्या जातील.
कडुनिंब, बाकन, हिवर, कांचन, वावळ, करंज, पिंपळ, उंबर, वड, पिंपरण, बाभूळ, रामकाटी बाभूळ, बूच पंगारा, रान पंगारा, काटसावर, पलाशा, आपटे, महारूख, शिंदी, सीताफळ, रामफळ, करवंद, अर्धा सुपारी, हादगा, शेवगा, चिंच, मोई, फळसा आदी वृक्षांच्या बिजांचा यात अंतर्भाव करण्यात येणार आहे. पावसाळा सुरू झाल्यावर संपूर्ण जिल्ह्यात बीज गोळ्यांच्या रोपणासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक घटकाला हे सीडबॉलवाटप विनामूल्य करण्यात येईल व जुलै २०२४ च्या पहिल्या २ आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र यांचे रोपण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. राजेश शेरेकर यांनी दिली.