दर्यापूर:
दर्यापूर तालुक्यातील वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या गुरुजनांचा अमृत महोत्सवी सपत्नीक सत्कार समारंभ नुकताच दर्यापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या वतीने श्री संत गजानन महाराज मंदिर मुर्तीजापुर रोड दर्यापूर येथे आयोजित करण्यात आला होता. 2008 पासुन दर्यापुरात उत्तमरावजी कराळे अध्यक्ष असतांनी सुरू झालेला हा अमृत महोत्सवी गुरुजनांचा सत्कार कार्यक्रम आजही सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष भास्करराव सावरकर, सरचिटणीस बाबुराव मोपारी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरराव पाथरे,जिल्हा प्रतिनिधी अंबादास कडू यांच्याअथक परिश्रमाने घेण्यात आला. यावेळी 75 वर्ष पूर्ण केलेल्या 42 सेवानिवृत्त गुरुजनांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. त्यांना शाल -श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सेवानिवृत्ती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव तुरखडे तर उद्घाटक म्हणून दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील वयाचे 95 वर्ष पूर्ण असलेले जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक अन्नाजी कंकाळे यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य तथा जे डी पाटील चे माजी प्राचार्य केशवरावजी गावंडे, जिल्हा सरचिटणीस शिवहरी भोंबे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव कराळे, जिल्हा कार्याध्यक्ष हरिश्चंद्र खैर, जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे संचालक तुळशीदास धांडे, माजी गटशिक्षणाधिकारी वीरेंद्र तराळ, डॉ.साबळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काकडे, रमेश भोरे, अनिल काकडे,बोरखडे गुरुजी विचारपीठावर उपस्थित होते. या अमृत महोत्सवी सत्कार समारंभ कार्यक्रमा नंतर दुसऱ्या सत्रात सेवानिवृत्तांच्या समस्यांवर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव तुरखडे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. व शासन निर्णयावर चर्चा करण्यात आली. शिक्षक बँकेचे संचालक तुळशीदास धांडे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये सेवानिवृत्तांसाठी शिक्षक बँकेचे कर्ज धोरण व योजना याबद्दल माहिती देऊन पुढील काळात सेवानिवृत्त अमृत महोत्सवी कार्यक्रमाकरिता सरळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष भास्करराव सावरकर यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश घाटे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त शिक्षक श्रीकृष्ण आगे, दिगांबर राठोड, जंगबाहद्दुर कुर्मी,शालिनी तायडे, वनमाला अघळते, लक्ष्मीबाई सराटे, ज्ञानेश्वरराव पाथरे,भास्करराव सावरकर, बाबुराव मोपारी यांनी प्रयत्न केले.