अमरावती, दि. ९ फेब्रुवारी २०२६ —
संविधान बांधिलकी महोत्सवांतर्गत संविधान जागर अभियान व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकृपा हायस्कूल, किरणनगर जवळ जलाराम नगर, अमरावती येथे संविधान जागर प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवकृपा हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. प्रदीप नानोटे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय डवरे, प्रफुल मंदा श्रीधर व दिलीप लाडे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. यानंतर मार्गदर्शकांनी प्रास्ताविकेमधून संपूर्ण संविधानाचा आशय स्पष्ट करत “देश कोण घडवणार, कसा घडवायचा आणि कशासाठी घडवायचा” याचे सविस्तर विश्लेषण केले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरले.
कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. “भारतीय संविधान आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे हे आज पहिल्यांदाच समजले” अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. तसेच अशा प्रकारचे संविधान जागर कार्यक्रम नियमितपणे शाळेत व्हावेत, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक पी. डी. बैतूले यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. टी. कापसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एस. डब्ल्यू. डवले, ए. सी. चौधरी मॅडम, एस. पी. बनसोड यांनी विशेष परिश्रम घेतले.













