चिखलदरा येथील वाहतूक नियंत्रण शुक्रवारपासून करण्याचा निर्णय

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

वनवे वाहतूक शुक्रवार ते सोमवारपर्यंत राहणार         पर्यटकांच्या सुविधांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज        एमआरपी पेक्षा अधिक दराने विक्री केल्यास कारवाई

अमरावती, दि. 16 (जिमाका): चिखलदरा येथील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी शनिवारी आणि रविवारी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यात वाहतुकीची कोंडी होत असल्याने चिखलदराकडे जाणारा आणि चिखलदरावरून परतवाड्याकडे येताना वनवे वाहतूक नियमन आता शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी दिले आहे.

चिखलदरा येथे पर्यटकांच्या सोयीसुविधांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह चिखलदरा आणि धारणीचे तहसीलदार, उपवनसंरक्षक आणि नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये प्रामुख्याने पर्यटकांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. पर्यटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात यापूर्वी शनिवार व रविवार या दोन दिवसांत चिखलदराला जाणारी वाहतूक आणि चिखलदऱ्यावरून परतवाड्याकडे येणारी वाहतूक ही वनवे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आत बदल करून ही वनवे वाहतूक आदल्या दिवशीपासूनच म्हणजे शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते पुढील दिवस म्हणजे सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ही लागू राहील. यामुळे वाहतूक नियंत्रणास अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल. वाहतुकीसाठी बनलेले सहा चोक पॉईंट्स शोधण्यात आले असून यामध्ये ५० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त पुढील काळात चिखलदरा व परिसरामध्ये राहणार आहे. त्यांच्यामार्फत वाहतूक नियंत्रण करण्यात येईल. सोबतच वनविभागाच्या नाक्यावर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे वनविभागाच्या नाक्यावरील वाहनांच्या लागणाऱ्या रांगा कमी होण्यास मदत होईल. सोबतच नगर परिषदेच्या नाक्यावर कर्मचारी वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे नाक्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

पर्यटकांच्या सुविधांसाठी पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना पार्किंगसाठी अतिरिक्त जागा शोधण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. आवश्यकता भासल्यास खाजगी जागा अधिग्रहित करून या ठिकाणी पार्किंगच्या सुविधा जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. यासोबतच पर्यटकांना गरजेचे असलेल्या पाण्याची बॉटल व इतर खाद्यपदार्थ नियत दरापेक्षा जास्त दराने विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सर्व आस्थापनांना सूचना देण्यात आल्या. नियत दरापेक्षा जास्त विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

सर्व विभागांशी समन्वय साधून चिखलदरा येथे येणाऱ्या उत्साही पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट द्यावी व निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

veer nayak

Google Ad