चांदूर रेल्वे येथील नागरिकांचे आमदार प्रताप अडसड यांना निवेदन
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
चांदूर रेल्वे शहरात 11 वी, 12 वीच्या उर्दु माध्यमाचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करा अशा मागणीचे निवेदन स्थानिक मुस्लीम समुदायातर्फे आमदार प्रताप अडसड यांना शनिवारी (ता. 28) नगर परिषद मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू पुर्व माध्यमिक शाळेत देण्यात आले.
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनातर्फे विशेष लक्ष दिले जाते. असे असतांना चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील उर्दु माध्यमाचे विद्यार्थी मात्र महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहत आहे. चांदूर रेल्वे शहरात दोन हजाराच्या जवळपास मुस्लीम समाजाची लोकसंख्या आहे. याशिवाय ग्रामिण भागातही मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. शहरात स्थानिक नगर परीषद व्दारा संचालित मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू पुर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा असून येथे दहाविचे शिक्षण आहे. मात्र चांदूर रेल्वे तालुक्याचे ठिकाण असतांनाही याठिकाणी केवळ दहावीपर्यंत उर्दु माध्यमाचे शिक्षण आहे. परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थी दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकत नाही. तसेच धामणगाव मतदारसंघात तीनही तालुक्यात उर्दु माध्यमाचे सायन्स महाविद्यालय नसुन सदर महाविद्यालय चांदूर रेल्वे शहरात झाल्यास त्याचा लाभ तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांना होऊ शकतो. याबाबत अनेकवेळा निवेदने देऊन उर्दु माध्यमाचे 11 वी, 12 वी चे शिक्षण सुरू करण्याची मागणी केली होती. अशातच 11-12 वर्षांपुर्वी एक वेळा यासंदर्भात स्थानिक नगर परीषदमध्ये ठराव घेण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी पुढे झालेली नाही. त्यामुळे आमच्या मागणीचा विचार करून उर्दू माध्यमाचे अकरावी व बारावीचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करावे या मागणीचे निवेदन नागरिकांनी आ. प्रताप अडसड यांना दिले. यावेळी आ. प्रताप अडसड यांनी सकारात्मक चर्चा नागरिकांसोबत केली. निवेदन देतेवेळी परवेज आलम, मोहम्मद इम्रान, राजीक शेख, सैय्यद ऐजाज, सैय्यद कैस, अजहर हुसैन, वाजीद खान, आमीर पठान, शेख सोहेल शेख रहीम, इम्रान सौदागर (शासकीय कंत्राटदार), अब्दुल फहिम, शहेजाद पठान, शेख गफ्फार, नुरूलहसन कुरैशी, सैय्यद जाकीर, युसुफ सौदागर, इरफान कुरैशी यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष नंदा वाधवानी, माजी नगरसेवक अजय हजारे, पप्पू भालेराव आदींची उपस्थिती होती.