भ्रष्टाचार प्रकरणातील बीडीओ मॅडमचा पंचायत समितीत धक्कादायक प्रवेश. जामिनावर असतानाही खुर्चीवर बसून फर्मान; कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण.

0
469
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : मनरेगा अपहारप्रकरणात आरोपी असलेल्या व सध्या ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर असलेल्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांनी सोमवारी (दि. १५) पंचायत समिती कार्यालयात अचानक प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. दुपारी १.१५ वाजता त्या थेट बीडीओ कक्षात गेल्या व खुर्चीवर बसून चार कर्मचाऱ्यांना आत बोलावून आदेश दिल्याने पंचायत समितीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाखाली असताना व प्रभार काढून घेतलेला असतानाही मरसकोल्हे यांनी कार्यालयीन वावर केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना “माझी अर्जित रजा टाका” असे आदेश दिले. तसेच, १२५ मिनिटांनंतर पुन्हा येणार असल्याचे सांगून त्या बाहेर पडल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मेघराज डोंगरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत, “भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी अधिकारी जामिनावर असताना बीडीओ कक्षात कशा काय बसू शकतात?” असा थेट सवाल केला.

दरम्यान, मरसकोल्हे यांच्या जामिनाचा लिफाफा संबंधित पोलिस ठाण्यात प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

तीन दिवस पोलिस कोठडी

मनरेगा अपहार प्रकरणात पोलिस तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर हिला अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. तिच्या जबाबावरून फिर्यादी असलेल्या बीडीओ सुनीता मरसकोल्हे यांनाही आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर मरसकोल्हे यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.

निलंबन न झाल्याने संशय

४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्यास निलंबनाची तरतूद असतानाही अद्याप निलंबनाचे आदेश न आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अधिकाऱ्यांचे स्पष्ट मत

“तत्कालीन बीडीओ सुनीता मरसकोल्हे यांचा प्रभार माझ्याकडे देण्यात आला आहे. जोपर्यंत माझ्याकडे प्रभार आहे, तोपर्यंत त्यांना खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही.”

प्रवीण चव्हाण,

प्रभारी गटविकास अधिकारी,

आर्वी

संबंधित अधिकारी कार्यालयात गेल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी खुलासा घेण्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेत पाचारण करण्यात आले आहे.”

— पराग सोमण,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद

प्रतिक्रिया

गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे नियम बाहे न्यायलायाचे आदेशाची अवमान करून पं. स. आर्वी मध्ये गटविकास अधिकारी याचे खुर्चीवर बसल्या जमानत आदेशात पं. स. परिसरात जाण्यास प्रतिबंध असताना बिनधास्त आदेशाची अहवेलना केल्या मुडे जमानत रद्द करण्यात येऊन अवमान्य याचिका दाखल करण्यात यावी.

             मेघराज डोंगरे

          वर्धा जिल्हा अध्यक्ष 

                 पी. री. पा.

veer nayak

Google Ad