धामणगाव रेल्वे :- येथील निर्मल उज्वल मल्टी स्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी बँक शाखेच्या तिजोरीतून ग्राहकांनी कर्जापोटी तारण ठेवलेली सोन्याची आठ पाकिटे चोरीला गेली आहेत.सदर प्रकरणी बँक प्रशासनाने शाखा व्यवस्थापकासह सहा कर्मचाऱ्यांची तक्रार दत्तापुर पोलिसात केली आहे.
शहराच्या मध्यवस्तीतील सिनेमा चौकात असलेल्या निर्मल उज्वल मल्टी स्टेट क्रेडिट को.ऑप सोसायटी बँक शाखेच्या एकूण १०१ ग्राहकांनी सोने तारण कर्जातुन आपले सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवले आहेत.मागील आठवड्यात झालेल्या अंतर्गत तपासणीत या बँकेच्या तिजोरीतून ८ सुवर्ण (सोन्याची) पाकिटे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दरम्यान बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने सदर दागिन्यांच्या सुवर्ण पाकिटांची चोरी केली असावी या संशयावरून निर्मल उज्वल मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नागपूर मुख्यालयाने बँकेचे शाखा प्रमुख योगेश वानखेडे,रोखपाल हरीश देवगडे,लिपिक प्रतीक्षा भैसे,निखिल क्षीरसागर व शिपाई सुरेंद्र गिरी यांना सदर प्रकरणी नोटीस बजावुन कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले.दरम्यान बँकेच्या रिजनल मॅनेजर भावना जोशी यांनी बँक शाखेत चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी केली असता बँकेच्या तिजोरीत सुरक्षित असायला हवे असलेले तारणातील सुवर्ण (सोने) पाकिटे प्रत्यक्ष तपासणीत गायब असल्याचे स्पष्ट झाल्याने बँकेचे अधिकारी व कर्मचारीच सदर चोरीत सामील असल्याचा संशय बळावला.चोरी गेलेल्या सुवर्ण (सोने)पाकिटांचा कोणताही शोध लागत नसल्याने अखेर मंगळवारी ता.१७ रिजनल मॅनेजर भावना जोशी यांनी सोने चोरी प्रकरणात बँकेचे शाखा व्यवस्थापक अनिरुद्ध रावत,शाखा प्रमुख योगेश वानखेडे,रोखपाल हरीश देवगडे,लिपिक प्रतीक्षा भैसे,निखिल क्षीरसागर व शिपाई सुरेंद्र गिरी यांच्या विरुद्ध दत्तापुर पोलिसात लेखी तक्रार केली आहे.सदर प्रकरणी बँक कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून बँकेच्या ग्राहकांमधून रोष व्यक्त होत आहे.शहरात बँकेच्या ग्राहकांमध्ये आपल्या जमा ठेवी धोक्यात तर नाही ना ? हा संभ्रम निर्माण झाला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदर घटनेमुळे बँकिंग व्यवस्थेच्या विश्वासाला मोठा धक्का बसला आहे.
————————–
फसवणूकीची जवाबदारी कोण घेणार ?
घरात चोरी होऊ नये म्हणून नागरिक बँकेच्या तिजोरीत दागदागिने,सोने व मूल्यवान वस्तू ठेवतात.बँकेच्या तिजोरीतून सुवर्ण पाकिटे चोरीला गेल्याने ‘इथे कुंपणच शेत खाते’ ही अवस्था निर्माण आहे.सदर घटनेत ग्राहकांच्या विश्वासाची उघडपणे लूट झाल्याचे स्पष्ट झाले असून ग्राहकांच्या फसवणूकीची जवाबदारी कोण घेणार ? त्यांचे चोरीला गेलेलं सोन परत केव्हा मिळणार ? हे प्रश्न उपस्थित होत आहे.
—————————
निर्मल उज्वल बँके शाखेचा पालक संचालक म्हणून शाखेतील सुवर्ण (सोने)पाकिटे चोरीला गेल्याची माहिती आहे.पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे संस्थेच्या मुख्यालय स्तरावरून योग्य ती कारवाई होईल.
लक्ष्मीनारायण चांडक
पालक संचालक
निर्मल उज्वल क्रेडिट को.ऑप.सोसायटी धामणगाव रेल्वे शाखा.
————————–
धामणगाव शहराच्या निर्मल उज्वल बँक शाखेतुन काही सोन्याची पाकिटे चोरीला गेल्याची घटना घडली आहे.सदर प्रकरणी लेखी तक्रार प्राप्त झालेली आहे सदर प्रकरणी चौकशी सुरू आहे.
गिरीश ताथोड
ठाणेदार ,दत्तापुर धामणगाव रेल्वे.
—













