अंजनसिंगीत नागरिकांचा संताप — बसस्थानकाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन!

0
54
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अंजनसिंगी (वार्ताहर) :
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बसस्थानकाच्या मागणीसाठी आज अंजनसिंगी येथे हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. दुपारी अचानक नागरिकांनी एकत्र येत मुख्य रस्त्यावर बसून चक्काजाम आंदोलन छेडले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

नागरिकांचे म्हणणे आहे की, अंजनसिंगी गाव मोठ्या प्रमाणावर व्यापारी, शैक्षणिक व शेतकरी दळणवळण केंद्र असूनसुद्धा आजपर्यंत येथे स्वतंत्र बसस्थानक उभारले गेले नाही. दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी आणि शेतकरी यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनतेचा संताप शेवटी रस्त्यावर आला.

आंदोलनादरम्यान “बसस्थानक द्या, हक्क आमचा पक्का करा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वजण या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, अचानक उभ्या राहिलेल्या या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांशी बोलणी सुरू असून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

नागरिक मात्र ठाम आहेत की, ठोस लेखी हमी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. त्यामुळे प्रशासनाची कसोटी लागली आहे.

या आंदोलनामुळे अंजनसिंगीत दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

veer nayak

Google Ad