धामणगाव रेल्वे :
अखिल भारतीय व्यापारी परिसंघ CAIT (Confederation of All India Traders) या प्रतिष्ठीत व्यापारी संघटनेतर्फे धामणगाव शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक व समाजकार्यकर्त्या सौ. राधा गोपाल भूत यांची CAIT TEAM महिला विंगच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे स्थानिक व्यापारी, उद्योजक व महिला वर्गामध्ये मोठा उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौ. राधा भूत या गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे व्यापारी समाजातील महिला वर्गाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यापारी बांधवांनी व्यक्त केला आहे.
CAIT ही संस्था देशभरातील व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने कार्यरत असून डिजिटल व्यवहार, व्यापारी धोरणे, उद्योजकता विकास आणि व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असते. या संघटनेच्या धामणगाव येथील महिला विंगच्या अध्यक्षपदी सौ. राधा भूत यांची नियुक्ती झाल्यामुळे स्थानिक महिला व्यापारी व उद्योजिका यांना नवा उत्साह लाभणार आहे.
नियुक्तीबद्दल व्यापारी व समाजातील मान्यवरांनी सौ. राधा भूत यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव महिला विंग अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.